२०२७ च्या विधानसभेत भाजपतर्फे पार्सेकर की सोपटे? माजी मुख्यमंत्र्यांनी ठोकला शड्डू

सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन; मांद्रे मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th April, 04:34 pm
२०२७ च्या विधानसभेत भाजपतर्फे पार्सेकर की सोपटे? माजी मुख्यमंत्र्यांनी ठोकला शड्डू

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून, आपण निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर नसल्याचे संकेत दिले आहेत. मी २०२७ ची निवडणूक लढवणार नाही, असे कधीच म्हटले नव्हते. मी एक राजकारणी आहे आणि आजही सामाजिक कार्यात तितकाच सक्रिय आहे, अशा शब्दांत पार्सेकर यांनी आपल्या विरोधकांना इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे मांद्रे मतदारसंघातील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे.



पार्सेकर यांनी मांद्रे येथील आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य करताना एक महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, मांद्रे मतदारसंघातून मी किंवा दयानंद सोपटे या दोघांपैकी एक जण नक्कीच निवडणूक लढवेल. दयानंद सोपटे आणि पार्सेकर हे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात, मात्र पार्सेकर यांच्या या नव्या विधानामुळे मतदारसंघात तिसऱ्या शक्तीला रोखण्यासाठी काही नवीन युती किंवा तडजोड होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.

विद्यमान आमदारांच्या कार्यकाळावर टीका करताना पार्सेकर यांनी विरोधकांच्या एकजुटीवर भर दिला. जर एखाद्या आमदाराच्या कार्यकाळात चुकीच्या गोष्टी आणि भ्रष्टाचार वाढत असेल, तर तो रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीच्या शर्यतीत अनेक जण असले तरी, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन मतदारसंघाचे हित जपण्यासाठी आपण मैदानात उतरू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पार्सेकर यांच्या या भूमिकेमुळे भाजपसह इतर राजकीय पक्षांच्या गोटातही आता खलबतांना सुरुवात झाली आहे.

हेही वाचा