कदंब पठारावरील बंगल्यात धाडसी चोरी; १० लाखांचे दागिने लंपास

जुने गोवे पोलिसांकडून तपास सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th April, 03:23 pm
कदंब पठारावरील बंगल्यात धाडसी चोरी; १० लाखांचे दागिने लंपास

पणजी : येथील कदंब पठार या उच्चभ्रू परिसरात रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी एका तीन मजली बंगल्यात धाडसी चोरी करत सुमारे ८ ते १० लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिक आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी बंगल्याचे मालक राजीव अग्रवाल यांनी जुने गोवे पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी अग्रवाल यांच्या तीन मजली बंगल्याला लक्ष्य केले. चोरट्यांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत प्रवेश करून सोन्याचे दागिने लंपास केले. पहाटे पाचच्या सुमारास घरातील  जाग आल्यानंतर घरातील एक व्यक्ती संबंधित खोलीत गेली असता, तेथील विस्कटलेले सामान पाहून तिला धक्का बसला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच तत्काळ घरमालकांनी पोलिसांशी संपर्क साधला.

यानंतर जुने गोवे पोलिसांनी रविवारी सकाळी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, मध्यरात्रीच्या सुमारास तीन संशयित व्यक्ती बंगल्यात शिरताना स्पष्टपणे दिसून आल्या. त्यांच्या चेहरे कपड्याने झाकले मात्र, चोरीला गेलेल्या मालाचा नेमका तपशील आणि वस्तूंची यादी तक्रारदाराकडून अद्याप पूर्णपणे स्पष्ट करण्यात आलेली नाही. सध्या पोलीस निरीक्षक गौरीष मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईश भोसले या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.


हेही वाचा