दूधसागर नदीवरील बंधाऱ्यांवर आंघोळीसाठी पर्यटकांची गर्दी

दुर्घटना टाळण्यासाठी निर्बंध लागू करण्याची मागणी


15th April, 06:34 pm
दूधसागर नदीवरील बंधाऱ्यांवर आंघोळीसाठी पर्यटकांची गर्दी

ताकार-दावकोण नदीच्या बांधाऱ्याखाली आंघोळ करणारे पर्यटक.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : राज्यात काही दिवसांपासून उष्म्याचा पारा चढत आहे. गरमीपासून सुटका करून घेण्यासाठी लोकांची पावले नदीकडे वळत आहेत. नदी, धबधबा, ओहळ, तळीवर आंघोळीसाठी गर्दी होत आहे. धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील ताकार-दावकोण, सातोण, आंबे, ओकांब व अन्य ठिकाणी दूधसागर नदीवरील बंधाऱ्यांवर आंघोळीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दारू पिऊन दंगामस्ती करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. बुडून मृत्यू होण्याचे प्रकार टाळण्यासाठी नदीवर येणाऱ्या लोकांवर निर्बंध लागू करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे.
काही दिवसांपासून कुळे ते ओकांब पऱ्यांच्या विद्युत सागर नदीवर पर्यटकांची गर्दीत वाढत आहे. त्यामुळे पूर्वीसारख्या दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या कुळे व फोंडा पोलीस गस्त घालून लोकांना धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याची सूचना करत आहेत. दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांकडून पोलीस व स्थानिक लोकांंशीच वाद घालण्याचा प्रकार होत आहे.
ताकार-दावकोण व काजूमळ येथील दूधसागर नदीवर उभारलेल्या बंधाऱ्यांवर आंघोळीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दूधसागर नदीवर बुडून मृत्यू होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांतून चिंता व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या विनंतीला धुडकावून पर्यटक नदीवर बिनधास्तपणे अंघोळ करत असल्याचे दिसून येते. पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडू शकतात. कुळे व फोंडा पोलीस गस्त घालत असले तरी पर्यटक पोलिसांना चकवा देऊन नदी गाठत आहेत.
नदीवर प्लास्टिक कचऱ्यात वाढ
पर्यटकांमुळे नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. यात प्लास्टिक कचऱ्याचा अधिक समावेश आहे. नदीत पोहताना यापूर्वी अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने बुडण्याचे प्रकार घडतात. नदीवर अंघोळीसाठी येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध लागू करावेत, अशी मागणी धारबांदोडा येथील सदानंद गावडे यांनी केली आहे.
नदीवर येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक लोक समजावून सांगतात. दारूच्या नशेत असलेले काही पर्यटक स्थानिकांशीच वाद घालतात. त्यामुळे गप्प राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नदीजवळील निर्जन स्थळावर प्रेमीयुगुलांचे प्रमाण वाढले आहे. निर्जन स्थळ असल्यामुळे येथे खुनासारखे प्रकारही घडू शकतात. पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी.
_ अंकुश नाईक, ग्रामस्थ, मोले

हेही वाचा