मी किंवा दयानंद सोपटे मांद्रेतून लढवणार आगामी निवडणूक!

लक्ष्मीकांत पार्सेकर : आमदार जीत आरोलकर यांच्यावर टीका

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
15th April, 06:34 pm
मी किंवा दयानंद सोपटे मांद्रेतून लढवणार आगामी निवडणूक!

हरमल : आगामी विधानसभा निवडणुकीत मी किंवा दयानंद सोपटे यापैकी एक जण निवडणूक लढवणार आहे. कोणत्या पक्षाच्या तिकिटावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, ते वेळ आल्यानंतर कळेल. मी राजकारणी असून माझे समाजकार्य चालूच आहे. लोकशाहीला उपद्रवी ठरणाऱ्या व्यक्तीपासून मतदारसंघाची मुक्तता होणे आवश्यक असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आमदार जीत आरोलकर यांच्यावर टीका केली.

येथील गणपत पार्सेकर स्मृती प्रतिष्ठान, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व केएलई मेडिकल कॉलेज व नेहरू काहेर मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत एकदिवसीय मेगा आरोग्य शिबिर रविवार, दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २.३० पर्यंत हरमल पंचक्रोशी विद्यासंकुल, भोम येथे आयोजित केल्याची माहिती पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी त्यांनी राजकीय भाष्य केले.

यावेळी अरुण बांधकर, नीलेश कांदोलकर, संदीप न्हानजी, धर्मा वस्त व केरकर उपस्थित होते. शिबिरात प्रमुख डॉक्टर तसेच आयुर्वेद व होमिओपॅथी विभागाद्वारे निष्णात वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बाल विभाग ते गायनोकोलॉजी व कार्डियाकपासून कॅन्सरपर्यंत मोफत तपासणी व औषधे पुरवण्यात येतील. साधारण १२१ डॉक्टर व पार्सेकर नर्सिंग कॉलेजच्या नर्सेस त्यांना सहाय्य करतील. या संकुलात २४ खोल्या शिबिरासाठी वापरण्यात येतील. यासाठी दोन्ही इस्पितळाकडून शिबिराचे आयोजन करण्याबाबत पत्रव्यवहार झाला असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.

जीत आरोलकर यांचा मनमानी कारभार

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचा मनमानी कारभार सुरू आहे. गेली साडेचार वर्षे आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. सरकारी अधिकारी त्यांच्या सूचनेनुसार वागतात, असे पार्सेकर यांनी सांगितले. चोपडे येथील सरकारी जागेत पुतळा उभारला, त्या जागेत पर्यटन विकास महामंडळाने कोटी रुपये खर्चून फाऊंटन उभारला होता तसेच विजेचे खांब होते. डॉ आंबेडकर यांच्याविषयी आदर आहे, मात्र आमदारांची कृती व वागणूक डॉ. आंबेडकर यांच्या संविधानविरोधात असल्याचे दिसून येते, असे पार्सेकर यांनी सांगितले. 


हेही वाचा