शिरगावात लईराई जत्रोत्सवाची धामधूम; अग्निदिव्य आणि कौलोत्सवाची उत्सुकता

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली सुरक्षा व्यवस्थेची पाहणी; ९०० पोलीस कर्मचारी तैनात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
शिरगावात लईराई जत्रोत्सवाची धामधूम; अग्निदिव्य आणि कौलोत्सवाची उत्सुकता
Pic By: BY- NARAYAN PISSURLEKAR

पणजी: गोव्यातील प्रसिद्ध धार्मिक उत्सवांपैकी एक असलेल्या शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. २१ एप्रिल रोजी होणाऱ्या या मुख्य जत्रोत्सवासाठी धोंडगण शुक्रवारपासून व्रतस्थ झाले असून, संपूर्ण राज्यभरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.



या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्थेची 'मॉकड्रिल' पार पडली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी उपस्थित राहून एकंदरीत व्यवस्थेची पाहणी केली आणि पोलीस तसेच आपत्कालीन यंत्रणांना आवश्यक त्या सूचना केल्या. तत्पूर्वी आमदार प्रेमेंद्र शेट आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही परिसराचा आढावा घेतला. यंदा गर्दी नियंत्रणासाठी सुमारे ९०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.



जत्रोत्सवाची परंपरा आणि  इतिहास पाहता, सुरुवातीला हा उत्सव केवळ दीड दिवसांचा असायचा, मात्र आता तो पाच दिवस साजरा केला जातो. या उत्सवाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे म्हापसा येथील मीराई सायबिणीकडून या जत्रेला तेल आणि फुलांची भेट येते, तर मीराई सायबिणीच्या फेस्ताला शिरगावच्या देवीकडून तेल पाठवले जाते. जत्रेच्या दिवशी आणि कौलोत्सवाच्या वेळी देवीला पिटकुळणी व कुड्याच्या फुलांचा घोस अर्पण केला जातो. भाविक अत्यंत श्रद्धेने मोगरीचे कळे असलेली आटी किंवा आबोल्यांचे झेले घेऊन देवीची ओटी भरतात. जत्रेच्या दिवशी सकाळी कलशातील पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.




जत्रोत्सवातील मुख्य विधींची सुरुवात चव्हाठा येथील धार्मिक कार्यक्रमांनी होते. चव्हाठ्यावरून देवी श्री सातेरी मंदिरात येते आणि त्यानंतर कौलांना प्रारंभ होतो. मानसवाडा येथून सुरू होणारा हा कौलोत्सव चार दिवस चालतो. गावातील प्रत्येक घराच्या दारात देवीचे आगमन होते व देवीची पूजा करून ओटी भरली जाते. जत्रेच्या दिवशी पहाटे मंगल कलशाची पूजा केली जाते आणि त्यातील तीर्थ घरोघरी दिले जाते. दुपारी मुळगाव, मये-वायंगणी येथील कवळास वाजत-गाजत मंदिरात येतात. विधींनंतर देवीची उत्सवमूर्ती पाळणी या सेवेकऱ्याच्या डोक्यावर दिली जाते आणि त्यानंतर तिचे शृंगारलेले रूप 'चिरा' मोडाच्या डोक्यावर ठेवून आदिस्थानाकडे मिरवणूक काढली जाते.




रात्रीच्या वेळी श्री सातेरी मंदिरात आबा भोजनाचा विधी होतो आणि लईराई मंदिरात थळवाटणीचा कार्यक्रम पार पडतो. यानंतर 'आरत' आणि 'हळदोणी'चे विधी पूर्ण झाल्यानंतर देवी स्वतःभोवती फेरा घालून होमखंडाच्या दिशेने प्रस्थान करते. सांकवाकडच्या देवचाराला कौल दिल्यानंतर देवी होमखंडाजवळ येते. चालता चालताच देवी एक छोटीशी चंद्रज्योत होमखंडात टाकते आणि क्षणात अग्नि प्रज्वलित होतो. त्यानंतर देवी तळीवर स्नान करून विश्रांतीसाठी 'मुड्डी' या आदिस्थानावर जाते.



पहाटेच्या वेळी होणारे 'अग्निदिव्य' हे या जत्रेचे सर्वात मोठे आकर्षण असते. मुड्डी येथे प्रत्येक धोंडाला देवीचा कौल मिळाल्यानंतर त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा संचारते आणि ते नामघोष करत धगधगत्या होमखंडातून धावतात. श्री होमखंडेश्वर धोंडांचे रक्षण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्व धोंड होमखंडातून गेल्यानंतर चौघुले आणि सरतेशेवटी आदिशक्ती श्री लईराई देवी स्वतः अग्नीप्रवेश करते. सोहळा झाल्यानंतर देवी ‘चव्हाठा’ येथे विश्रांतीसाठी थांबते. या सोहळ्यानंतर अग्नीची प्रखरता इतकी वाढते की त्यातून कोणालाही जाता येत नाही. पाचव्या दिवशी सीमेवरील देवतांना कौल दिल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात देवी मंदिरात परतते आणि या भव्य सोहळ्याने जत्रेची सांगता होते.



हेही वाचा