गोव्याची साध्वी सैल 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६' ची मानकरी

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
19th April, 11:14 am
गोव्याची साध्वी सैल 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६' ची मानकरी

भुवनेश्वर : भारतीय सौंदर्य विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या 'फेमिना मिस इंडिया २०२६' या स्पर्धेवर गोव्याच्या साध्वी सतीश सैल हिने आपले नाव कोरले आहे. १८ एप्रिल रोजी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील 'कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी' (KIIT) मध्ये पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात साध्वीला 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६' चा मुकुट प्रदान करण्यात आला. या ऐतिहासिक विजयामुळे आता ती जागतिक स्तरावर होणाऱ्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

६१ व्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत देशभरातील ३० स्पर्धकांना मागे टाकत साध्वीने हे यश संपादन केले. साध्वी केवळ तिच्या सौंदर्यानेच नव्हे, तर अफाट बुद्धिमत्तेनेही उठून दिसली. तिने कॅनडातील नामांकित विद्यापीठातून 'अर्थशास्त्र' आणि 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयांत दुहेरी पदवी मिळवली आहे. विशेष म्हणजे, साध्वीला सात भाषांचे ज्ञान असून तिच्या प्रभावी संवाद कौशल्याने परीक्षकांची मने जिंकली. ती व्यावसायिक क्षेत्रातही सक्रिय असून एका बांधकाम आणि विकास कंपनीची सह-संस्थापक आहे.


Sadhvi Satish Sail Crowned Femina Miss India World 2026 At Bhubaneswar Grand Finale


गोव्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या साध्वीचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. या स्पर्धेसाठी तिने कठोर मेहनत घेत तब्बल १० किलो वजन कमी केले. तिच्या या शारीरिक परिवर्तनामुळे 'बेस्ट बॉडी' श्रेणीतही ती अव्वल पाचमध्ये राहिली. तिला लहानपणापासून असलेल्या मधमाश्यांच्या भीतीवर मात करण्यासाठी तिने चक्क 'मधमाशी पालना'चे प्रशिक्षण घेतले, जे तिच्या धाडसी वृत्तीचे दर्शन घडवते. साध्वीला फिरण्याची आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची प्रचंड ओढ आहे. गेल्या तीन वर्षांत तिने १० देशांचा एकटीने प्रवास केला आहे. तसेच तिला 'टॅक्सिडर्मी' (प्राण्यांच्या प्रतिकृती जतन करणे) सारखा दुर्मिळ छंदही आहे.

सौंदर्यवती आणि उद्योजिका असण्यासोबतच साध्वी एक संवेदनशील समाजसेविका म्हणूनही कार्यरत आहे. कुपोषित मुले आणि दिव्यांग (बोलण्यास व ऐकण्यास असमर्थ) मुलांच्या शिक्षण व आरोग्यासाठी ती सातत्याने निधी उभारण्याचे काम करते. साध्वीच्या या देदीप्यमान यशामुळे संपूर्ण गोवा राज्यात आनंदाचे वातावरण पसरले असून, गोव्याच्या लेकीने राष्ट्रीय स्तरावर राज्याचे नाव उंचावल्याबद्दल तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा