अग्निशामक दलात नोकरीसाठी विशेष आयटीआय कोर्स अनिवार्य!

मुख्यमंत्र्यांकडून घोषणा : पणजीत ‘करियर जागोर’ कार्यक्रम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th April, 11:40 pm
अग्निशामक दलात नोकरीसाठी विशेष आयटीआय कोर्स अनिवार्य!

पणजीत ‘करियर जागोर’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

पणजी : पुढील वर्षापासून आयटीआयमध्ये अग्निशमन सेवा हा एका वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. अग्निशामक दलामध्ये जवान म्हणून भरती होण्यासाठी हा अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. सोमवारी पणजीत करियर जागोर या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटी संचालक मेघना शेटगावकर, भूषण सावईकर, गोविंद पर्वतकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आज विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, डिजिटल मीडिया, सायबर सुरक्षा अशा अनेक नवीन करिअर संधी उपलब्ध झाल्या आहेत. एखाद्या पदासाठी तीस वर्षांपूर्वी ठरवण्यात आलेली पात्रता आता लागू होत नसेल तर ती बदलली पाहिजे. यानुसार राज्य सरकार भरती नियमात (आरआर) बदल करत आहे. याआधी अग्निशामक दलात जवान म्हणून काम करण्यासाठी दहावी किंवा बारावी ही पात्रता होती. आता यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात अन्य आधुनिक अभ्यासक्रमानुसार आरआर बदलले जातील.
ते म्हणाले, करियर जागोर अंतर्गत राज्यातील प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाला करियर मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करतील. हे शिक्षक विद्यार्थ्यांचे करियर राजदूत म्हणून काम करतील. शिक्षकांनी विद्यार्थी आणि त्याच्या करिअरमधील दुवा म्हणून काम करावे. विद्यार्थ्यांची आवड जाणून घेऊन त्यांना योग्य करिअर कोणते आहे हे सांगावे. गोव्याची भविष्य हे आजच्या युवा पिढीच्या हातात आहे. यासाठी त्यांना योग्य करिअर मिळणे गरजेचे आहे.
प्रशिक्षित शिक्षकांना इन्सेंटिव्ह देण्याचा विचार
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांना एससीईआरटीकडून करियर मार्गदर्शक म्हणून नियुक्तीपत्र दिले जाईल. अशा शिक्षकांना इन्सेंटिव्ह देण्याबाबत आम्ही विचार करणार आहेत. तसेच करिअर मार्गदर्शन न करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार देखील सुरू आहे.

हेही वाचा