उच्च न्यायालयाचे निरीक्षण : चौघांविरोधातील गुन्हा, आरोपपत्र रद्द

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : स्पा पार्लरमध्ये उपस्थित असणे हा गुन्हा नाही. तेथे गेलेल्या संशयितांनी मानवी तस्करीस बळी पडलेल्या व्यक्तीचे शोषण केल्याचे पुरावे समोर आलेले नाहीत, असे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय प्रकरणी दावणगिरी (कर्नाटक) येथील बेरुल नाझीर अहमद, अहमद शेख, अहमद राजा आणि कबीर खान यांच्या विरोधातील गुन्हा आणि आरोपपत्र रद्द केले. छापा दरम्यान मसाज खोलीत उपस्थित असलेला बी. दादापीर याच्याविरोधात खटला सुरू राहणार असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबतचा आदेश न्या. आशिष चव्हाण यांनी दिला.
या प्रकरणी पणजी पोलिसांनी १९ मे २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पणजीतील एका स्पा पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहक पाठवून स्पाच्या बाहेर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने इशारा दिल्यानंतर पथकाने स्पावर छापा टाकला. पोलिसांनी स्पामधील रुबीता जना हिच्यासह तेथे उपस्थित बेरुल नाझीर अहमद, अहमद शेख, अहमद राजा, कबीर खान आणि बी दादापीर या ग्राहकांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयित रुबीता जनासह बेरुल नाझीर अहमद, अहमद शेख, अहमद राजा, कबीर खान आणि बी दादापीर याच्या विरोधात वेश्याव्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात ५ एप्रिल २०१६ रोजी आरोपपत्र दाखल केले.
बनावट ग्राहक, पथकाची साक्ष ठरली महत्त्वाची
वरील संशयितांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयात सुनावणी झाली असता, छापा वेळी संशयित बेरुल नाझीर अहमद, अहमद शेख, अहमद राजा आणि कबीर खान हे बाहेर प्रतीक्षा कक्षात होते. संशयित बी. दादापीर सुटका केलेल्या महिलेसह खोलीत होता, अशी साक्ष बनावट ग्राहक व पथकातील सदस्यांनी दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयित बेरुल नाझीर अहमद, अहमद शेख, अहमद राजा आणि कबीर खान यांच्या विरोधात गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याचा आदेश दिला.