साळगाव येथील दुहेरी खूनप्रकरणी फरार आरोपीला ओडिशात अटक

सहा महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा


36 mins ago
साळगाव येथील दुहेरी खूनप्रकरणी फरार आरोपीला ओडिशात अटक

फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात सहभागी झालेले पोलीस पथक. सोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी.

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : मुड्डोवाडा-साळगाव येथे रिचर्ड डिमेलो व अभिषेक ऊर्फ सोनू गुप्ता यांचा खून झाला होता. या दुहेरी खून प्रकरणातील फरार आरोपी जगन्नाथ रामचंद्र भगत (मूळ सुंदरगड, ओडिशा) या गुन्हा शाखेने ओडिशात अटक केली आहे.
मुड्डोवाडा-साळगाव येथे भाड्याच्या खोलीत ६ नोव्हेंबर २०२५ रोजी हा खुनाचा प्रकार झाला होता. रिचर्ड आगासियो डिमेलो (६५, रा. गिरी, बार्देश) व अभिषेक ऊर्फ सोनू गुप्ता (२५, रा. इंदूर-मध्यप्रदेश) यांची डोक्यावर कुकरने हल्ला करून व नंतर गळा चिरून हत्या करण्यात आली होती. रिचर्ड यांचा म्युझिकल पार्ट्स दुरुस्ती करण्याचा व्यवसाय होता. अभिषेक हा रिचर्ड यांच्याकडे घटनेच्या रात्रीच कामाला आला होता. संशयित जगन्नाथ भगत हाही रिचर्ड यांच्याकडे कामाला होता. खून केल्यानंतर संशयित जगन्नाथ फरार झाला होता. साळगाव पोलिसांनी संशयित जगन्नाथच्या विरोधात भारतीय न्याय संहिंतेच्या कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यांत पोलीस पथके पाठविली होती. मात्र तो न सापडल्याने पोलिसांनी ‘लुक आऊट’ नोटीस जारी केली होती.


संशयित ओडिशा राज्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन लोकरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक माधव नाईक आणि हवालदार चंद्रशेखर पेडणेकर यांच्या पथकाला ओडिशात पाठविण्यात आले. पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेऊन संशयित भगतच्या मुसक्या आवळून त्याला गोव्यात आणले. संशयिताला साळगाव पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
दरम्यान वरील पथकाला अधीक्षक विश्वेश कर्पे, उपअधीक्षक सूरज हळर्णकर, निरीक्षक तुषार लोटलीकर, दिनेश गडेकर, उपनिरीक्षक प्रगती मळीक, अमीन नाईक, डेव्हीड डिकॉस्टा, मंदार परब, सीताराम मळीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मदत केली.
क्षुल्लक कारणावरून दोघांना संपवले
संशयित जगन्नाथ भगत ओडिशा येथील मूळ रहिवासी असून रायपूर (छत्तीसगढ) येथे राहत होता. त्याने इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्किंग यांचे मूलभूत प्रशिषण घेतले होते. त्याने दिल्लीत मोबाईल व लॅपटॉप दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. रिचर्ड डिमेलो यांनी दिलेल्या ओएलएक्सवरील जाहिरात वाचून तो गोव्यात आला. तो डिमेलो यांच्याच घरी राहत होता. पगार, जेवणाच्या पैशांवरून त्यांच्यात वाद होत होते. राहणीमानावरून झालेल्या वादामुळे भगत संतापला होता. क्षुल्लक कारणारून त्याने दोघांचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.