वास्को पोलीस स्थानकावर मोर्चा : कठोर कारवाईचे पोलिसांचे आश्वासन

गुरुदास कदम यांना निवेदन देताना सिरिल फर्नांडिस व इतर.
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गौतम खट्टर याच्याविरोधात वास्को पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार आंतोनियो वाझ यांनीही खट्टरच्या वक्तव्याचा निषेध करून कारवाईची मागणी केली आहे. खट्टरच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. येथील ख्रिश्चन बांधवानी सोमवारी वास्को पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन तत्काळ कारवाईची मागणी केली. कार्यक्रम आयोजकांनी अपमानजनक टिप्पणीबद्दल खेद व्यक्त केला आहे. भावना दुखवल्या गेलेल्यांची माफीही मागितली आहे.
येथील टिळक मैदानावर १८ रोजी परशुराम जंयतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार साळकर, आमदार आमोणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला गौतम खट्टर प्रमुख वक्ते होते. त्यांनी मार्गदर्शनात सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याबद्दल अपमानस्पद वक्तव्य केले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि उपस्थितांपैकी काहीजणांनी भाषण चालूच ठेवण्याची मागणी केली. यावेळी आयोजकांनी त्यांना तत्काळ थांबविले. तथापि त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होताच संतापाची लाट पसरली. कुठ्ठाळीचे काँग्रेस नेते पीटर डिसोझा यांनी रविवारी वास्को पोलीस स्थानकात खट्टरविरोधात तक्रार दिली. त्याची दखल घेऊन वास्को पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा नोंद केला. उपनिरीक्षक डेव्हिड कॉस्ता पुढील तपास करत आहेत.
द कॅथलिक असोसिएशनचे पोलिसांना निवेदन
द कॅथलिक असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष सिरिल फर्नांडिस यांनी शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षक गुरुदास कदम यांची भेट घेतली. त्यांनी खट्टरला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. मंत्री गुदिन्हो, आमदार साळकर, आमदार आमोणकर यांनी सेंट झेव्हियर यांच्याचरणी माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर सार्वजनिक बहिष्कार जाहीर करा, असे आवाहनही सिरिल यांनी केले. असोशिएशनने अधीक्षक कदम यांना निवेदन दिले. कदम यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
शांतता बाळगण्याचे चर्चचे आवाहन
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करतानाच संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी चर्चने केली आहे. जातीय सलोख्याचा वारसा लाभलेल्या सर्व समुदायातील जनतेने शांतता बाळगावी, असे आवाहन चर्चने पत्रकाद्वारे केले आहे.
खट्टरच्या शोधार्थ पोलीस पथके पाठवणार : गुरुदास कदम
गौतम खट्टर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके पाठविण्यात येणार आहेत. खट्टरच्या वक्त्यव्याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. तथापि गुन्हा नोंदविण्यापूर्वीच ते गोव्याबाहेर गेल्याने त्यांना अटक करता आले नाही. खट्टरविरोधात सहा तक्रारी दाखल झाल्या आहेत. सर्व तक्रारीची एकत्रितपणे चौकशी होणार आहे. खट्टर यांना ताब्यात घेतल्यावर पुढील कारवाई करण्यात केली जाईल. पोलीस विविध स्तरांवरून चौकशी करत आहेत, असेही कदम यांनी स्पष्ट केेले.
गोव्याबाहेरील वक्त्यांनी येथे येऊन धार्मिक सलोखा बिघडेल अशी विधाने करू नयेत. आयोजकांनी वक्त्यांना योग्य समज देणे आवश्यक आहे. या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून संशयितावर कडक कारवाई केली जाईल. व्यासपीठावरील आमदारांनी वक्त्याला तिथेच थांबवायला हवे होते, मात्र काहीवेळा तातडीने तसे करणे शक्य होत नाही.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
सेंट झेविअर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गौतम खट्टर याच्याविरोधात वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. प्राधान्याने कायद्यानुसार पुढील कारवाई नक्कीच केली जाईल.
_ संतोष देसाई, अधीक्षक, दक्षिण गोवा 
खट्ट्ररने सेंट झेवियर यांचा उल्लेख ‘आतंकवादी’ असा करणे, हा भाजपचा जातीय ध्रुवीकरण करण्याचा डाव आहे. कार्यक्रमाला उपस्थित पोलिसांवरही कारवाई करा. कार्यक्रमात मंत्री गुदिन्हो, आमदार आमोणकर, आमदार साळकर उपस्थित होते. त्यांनी भाषण बंद करायला का लावले नाही ?
- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
आमचा सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्यावर विश्वास आहे. खट्टर यांचे वक्तव्य निंदनीय आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे अनावश्यक तणाव निर्माण होण्याचा धोका आहे. कार्यक्रमात मी दोनदा खट्टर यांना थांबविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना जबरदस्तीने थांबविले असते, तर कदाचित तेथे वाईट घटना घडण्याची शक्यता होती. यासाठी मी शांत राहिलो. गोमंतकीयांनी शांतता बाळगावी. कायद्याला त्यांचे काम करू द्या.
_ मॉविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री