प्राथमिक शिक्षक पदासाठीची दुसरी सीबीटी १० मे रोजी

मराठीत ६६०, तर कोकणीत ९९ उमेदवार पात्र


33 mins ago
प्राथमिक शिक्षक पदासाठीची दुसरी सीबीटी १० मे रोजी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : प्राथमिक शाळांतील मराठी आणि कोकणी शिक्षक पदांसाठीची दुसरी सीबीटी रविवार, १० मे रोजी होणार आहे. मराठी शिक्षकांच्या ३५२ पदांसाठी ६६०, तर कोकणीच्या ३८ पदांसाठी ९९ उमेदवार पात्र ठरले आहेत. पहिल्या सीबीटीच्या गुणांवर उमेदवारांची पात्रता यादी जाहीर झाली आहे. रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या १३ पदांसाठीची पहिली सीबीटीही १० मे रोजी होणार आहे.
कर्मचारी भरती आयोगामार्फत प्राथमिक शाळांत मराठी आणि कोकणी शिक्षक पदे भरण्यासाठीची जाहिरात ३० जानेवारी रोजी देण्यात आली होती. मराठी शिक्षकांची ३५२, तर कोकणी शिक्षकांसाठी ३८ पदे रिक्त आहेत. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर पहिली सीबीटी झाली. त्याचा निकाल जाहीर होऊन आयोगाने पात्रता यादीही जाहीर केली आहे. दुसऱ्या सीबीटीची तारीख जाहीर झाली असली तरी अद्याप स्थळ आणि वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
मराठीच्या दुसऱ्या सीबीटीला बसणाऱ्या ६६० उमेदवारांपैकी सर्वसामान्य गटातील ५५३, अनुसूचित जमाती (एसटी) ४४, अनुसूचित जाती (एससी) ७, इतर मागासवर्गीय (ओबीसी) ५०, अार्थिकदृष्ट्या मागास (इडब्ल्यूएस) गटातील ५, तर क्रीडा गटातील १ उमेदवार आहेत. कोकणीच्या ९९ उमेदवारांपैकी ६७ सर्वसामान्य गटातील, तर इतर मागासवर्गीय गटातील (ओबीसी) ३२ उमेदवार आहेत.
इतर पदांसाठीची सीबीटी २५ एप्रिलपासून
पंचायत सचिव, तलाठी, अवर कारकून, माहिती साहाय्यक, स्टोअर कीपर, गोडाऊन कीपर, कारकून आदी पदांसाठीची पहिली सीबीटी २५, २६ एप्रिल, २ आणि ३ मे रोजी होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. उत्तर गोव्यात आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आसगाव) आणि सेंट झेवियर महाविद्यालय, धुळेर म्हापसा येथे परीक्षा होणार आहे. दक्षिण गोव्यात डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय फातोर्डा, रोजरी महाविद्यालय नावेली आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कुंकळ्ळी येथे परीक्षा होईल.       

हेही वाचा