वास्को प्रकरणावर मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सोडले मौन. आयोजकांनी वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देताना अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त.

पणजी : वास्को येथे आयोजित भगवान परशुराम जयंती कार्यक्रमात वक्ता गौतम खट्टर याने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे गोव्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर मंचावर उपस्थित असलेले पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो आणि वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत अशा प्रकारच्या प्रक्षोभक विधानांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गोव्याची ओळख असलेल्या सर्वधर्मीय समभावाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी या घटनेवर सविस्तर स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित वक्ता जेव्हा चुकीची आणि प्रक्षोभक विधाने करू लागला, तेव्हा त्याला मंचावरूनच रोखण्याचे दोनवेळा प्रयत्न करण्यात आले होते. स्वतः गुदिन्हो यांनी आयोजकांमार्फत वक्त्याला भाषण थांबवण्यासाठी एक लेखी चिठ्ठी (Written Note) देखील पाठवली होती. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी वक्त्याला त्याचे बोलणे सुरू ठेवण्यास सांगितल्याने एक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अशा संवेदनशील वेळी जर भाषण जबरदस्तीने बंद केले असते, तर तिथेच मोठा गोंधळ किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. केवळ संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी नाईलाजाने आपल्याला ते भाषण ऐकावे लागले, असे समर्थन गुदिन्हो यांनी दिले आहे. मुळात मुरगावच्या तिन्ही आमदारांना आयोजकांनी निमंत्रण दिले होते. त्यास मान देऊन तेथे गेलो होतो. वक्ते कोण आहेत, त्याची पार्श्वभूमी काय याबाबत काहीही कल्पना नव्हती. दोन चांगल्या गोष्टी कानावर पडतील अशी अपेक्षा होती. जे झाले ते चुकीचेच झाले असेही ते म्हणाले.
गुदिन्हो यांनी पुढे नमूद केले की, सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल केलेली टिप्पणी अत्यंत चुकीची असून त्यामुळे समस्त गोमंतकीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. बाहेरून येणारी कोणतीही व्यक्ती गोव्यातील वर्षानुवर्षांचा धार्मिक एकोपा बिघडवू शकत नाही. या प्रकरणाचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट केले की सरकार किंवा मंचावरील लोक या विधानांशी सहमत नाहीत. या प्रकरणी आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदा आपले काम करेल आणि दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आयोजकांनी देखील वक्त्यांची निवड करताना अधिक जबाबदारीने वागायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ही विधाने अनावश्यक : आमदार दाजी साळकर
याच प्रकरणावर वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनीही आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दलची विधाने अनावश्यक असून ती गोव्यातील सामाजिक सौहार्द बिघडवणारी आहेत, असे साळकर म्हणाले. गोव्यात सर्व धर्माचे लोक एकमेकांचा आदर करत गुण्यागोविंदाने राहतात, ही परंपरा अबाधित राखणे गरजेचे आहे. साळकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील दोषींवर तातडीने आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. समाजात फूट पाडणारे कोणतेही वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
खट्टरवर कारवाई होईल : मुख्यमंत्री
गौतम खट्टर याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. वास्को येथील भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमात झालेल्या या वादग्रस्त प्रकारानंतर संपूर्ण गोव्यात संतापाचे वातावरण असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याबाहेरील वक्त्यांनी येथे येऊन राज्यातील धार्मिक सलोखा बिघडेल अशी विधाने करू नयेत. आयोजकांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना वक्त्यांना आधीच योग्य समज देणे आवश्यक आहे. या प्रकरणी आम्ही एफआयआर नोंदवला असून संशयितावर कडक कारवाई केली जाईल. व्यासपीठावरील आमदारांनी वक्त्याला तिथेच थांबवायला हवे होते, मात्र काहीवेळा तातडीने तसे करणे शक्य होत नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.