म्हणाले-गोव्याबाहेरील वक्त्यांनी येथे येऊन गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडेल अशी विधाने करू नयेत. आयोजकांनाही सुनावले

पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गौतम खट्टर याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. वास्को येथील भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमात झालेल्या या वादग्रस्त प्रकारानंतर संपूर्ण गोव्यात संतापाचे वातावरण असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याबाहेरील वक्त्यांनी येथे येऊन राज्यातील धार्मिक सलोखा बिघडेल अशी विधाने करू नयेत. आयोजकांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना वक्त्यांना आधीच योग्य समज देणे आवश्यक आहे. या प्रकरणी आम्ही एफआयआर नोंदवला असून संशयितावर कडक कारवाई केली जाईल. व्यासपीठावरील आमदारांनी वक्त्याला तिथेच थांबवायला हवे होते, मात्र काहीवेळा तातडीने तसे करणे शक्य होत नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दुसरीकडे, या प्रकरणाचे पडसाद कायदेशीर पातळीवरही उमटत आहेत. हळदोणाचे काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनीही वास्को पोलीस स्थानकात गौतम खट्टर विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २९९ आणि १९६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पीटर डिसोझा यांनी काल दिलेल्या तक्रारीनंतर आता राजकीय नेत्यांकडूनही तक्रारींचा ओघ सुरू झाला असून खट्टरला तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.