वास्को : परशुराम जन्मोत्सव सोहळ्यात सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दल आक्षेपार्ह विधान; गुन्हा दाखल

आयोजकांनी मागितली माफी; तर राजकीय नेत्यांकडून निषेधाचा सूर, म्हणाले- हा धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
वास्को : परशुराम जन्मोत्सव सोहळ्यात सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दल आक्षेपार्ह विधान; गुन्हा दाखल

पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी संशयित गौतम खट्टर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १८ एप्रिल रोजी खारेवाडो येथील टिळक मैदानावर आयोजित 'भगवान परशुराम जन्मोत्सव' या कार्यक्रमादरम्यान हे विधान करण्यात आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गोव्यात सध्या संतापाची लाट उसळली आहे. ख्रिश्चन बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आणि कुठ्ठाळीचे काँग्रेस नेते पीटर डिसोझा यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी १९ एप्रिल रोजी रात्री ११:१८ वाजता एफआयआर नोंदवला.



या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २९९ आणि १९६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. संशयिताने जाणीवपूर्वक आणि विद्वेषपूर्ण भावनेने टिप्पणी करून दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. पीटर डिसोझा यांनी या घटनेवर तीव्र टीका करताना म्हटले आहे की, मंत्री मॉविन गुदिन्हो आणि इतर आमदारांच्या उपस्थितीत भर सार्वजनिक कार्यक्रमात अशा प्रकारची विधाने होणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. त्यांनी केवळ वक्त्यावरच नव्हे, तर आयोजक आणि उपस्थित नेत्यांवरही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.



दुसरीकडे, वास्को येथील परशुराम जयंती उत्सवाच्या आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल वापरलेले शब्द दुर्दैवी असून, वक्त्याने असे बोलणे सुरू करताच त्याला तातडीने थांबवण्यात आले होते, असा दावा आयोजकांनी केला आहे. या घटनेबद्दल खेद व्यक्त करत ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची आयोजकांनी माफी मागितली आहे. मात्र, तरीही गोव्यातील विविध राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे.


विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. गौतम खट्टर यांनी 'गोंयचो सायब' यांचा अपमान करून गोमंतकीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने कारवाई करून त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर गोव्यात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनीही या विधानाचा निषेध करत म्हटले की, अशा संवेदनशील विधानांमुळे गोव्यातील प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या धार्मिक सलोख्याला धोका निर्माण झाला आहे. केवळ वक्ताच नव्हे, तर मंचावर उपस्थित असलेले नेतेही याला जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



आमदार एल्टन डिकोस्टा यांनी या वादाचा विस्तार पणजीपर्यंत झाल्याचे निदर्शनास आणून दिले. रविवारी पणजी येथील एका कार्यक्रमात जनशिक्षण संस्थेचे संचालक श्रीहरी आठले यांनीही सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा अपमान केल्याचा आरोप डिकोस्ता यांनी केला. हे सर्व कुठे थांबणार? असा संतप्त सवाल त्यांनी या कार्यक्रमावरून उपस्थित केला. तर, हळदोणाचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी पोलिसांना 'सुओ-मोटो' दखल घेऊन खट्टर यांना अटक करण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक स्थळांचा अपमान करण्याचे किंवा तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, त्याबद्दल गोमंतकीयांनी सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आम आदमी पार्टीचे (आप) गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनीही पोलीस महासंचालक आलोक कुमार यांना पत्र लिहून गौतम खट्टर यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. भाजप मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत अशी विधाने होणे हे धार्मिक सलोखा बिघडवण्याचे जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न आहेत, असे नाईक यांनी पत्रात नमूद केले आहे. गोव्याच्या शांततापूर्ण सामाजिक संरचनेत अडथळा आणणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना विलंब न लावता चोख प्रत्युत्तर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव धनंजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

हेही वाचा