मंत्री दिगंबर कामत यांचा विजय सरदेसाईंना टोला

मडगाव : आपणास मडगावात कुणीही आल्यास काहीही फरक पडत नाही. मडगावकरांवर आपला विश्वास असून ते पाठिशी असेपर्यंत कोणतीही भीती नाही. फातोर्डा मतदारसंघाबाबत पक्षाने सूचना केल्यास त्याठिकाणीही काम करण्यास तयारी आहे, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी केले.
आगामी नगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत बोलताना मंंत्री दिगंबर कामत यांनी भाजप पक्षाने जबाबदारी दिल्यास फातोर्डामध्येही काम करणार असल्याचे म्हटले. यापूर्वीच्या पालिका निवडणुकांमध्ये आमदार विजय सरदेसाई व कामत यांची युती होती. पण, कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही युती तुटली व त्यानंतर झालेल्या घडामोडीत मंत्री कामत यांनी मडगाव पालिकेवर वर्चस्व राखले आहे. आता आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार सरदेसाई यांनी मडगावातही काम करणार असल्याचे सांगत उमेदवार उभे केले जातील, असे याआधी सांगितले होते. त्याबाबत बोलताना मंत्री कामत यांनी सांगितले की, मडगावात कुणीही आल्यास आपणास फरक पडत नाही. मडगावातील लोक आपल्यासोबत असल्यास व देव दामोदराचा आशीर्वाद असल्यास कोणत्याही निवडणुकीत अडचण येणार नाही. फातोर्डा मतदारसंघाचा विषय असल्यास पक्षाने जबाबदारी दिल्यास व काम करण्यास सांगितल्यास कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले.
मंत्री कामत यांनी बांधकाम खात्याबाबत बोलताना सांगितले की, खात्यातील कामांबाबत सुसूत्रता आणण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. उपविभागीय किंवा विभागीय स्तरावरील अंदाजपत्रकांची फेरतपासणी करण्याची कोणतीही सोय नव्हती पण आता त्यासाठी नवी यंत्रणा उभारण्याचा विचार असून कामे चांगली होण्यासाठी पाहणी व पडताळणीचाही त्यात समावेश असेल, असे सांगितले.
कला अकादमीबाबत तज्ज्ञांवर विश्वास
कला अकादमीच्या इमारतीवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना कामत यांनी सांगितले की, मी अद्याप या इमारतीची अधिकृत पाहणी केलेली नाही. मी काही विधान केल्यास विनाकारण वादात भर पडू नये म्हणून मी तिथे गेलो नाही. मात्र, प्रधान मुख्य अभियंता संदीप चोडणकर हे इमारतींच्या कामात तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कला अकादमीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.