काँग्रेस हा देशविरोधी पक्ष; ७० कोटी महिलांची त्यांनीच केली फसवणूक: मुख्यमंत्री डॉ. सावंत

महिला आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर घणाघाती प्रहार; उत्तरदायित्व स्वीकारण्याचे केले आवाहन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
46 mins ago
काँग्रेस हा देशविरोधी पक्ष; ७० कोटी महिलांची त्यांनीच केली फसवणूक: मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस पक्षावर अत्यंत गंभीर शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस हा एक देशविरोधी (अँटी-नॅशनल) पक्ष असून, जर देशातील ७० कोटी महिलांची कोणी फसवणूक केली असेल, तर ती काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केली आहे, अस आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. पणजी येथे भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पावले उचलली असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, काँग्रेसने देशाला महिला पंतप्रधान दिली, मात्र अनेक दशके सत्तेत राहूनही ते महिलांना संसदेत आरक्षण देऊ शकले नाहीत. ही महिला शक्तीची मोठी प्रतारणा आहे. मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर करून महिलांना त्यांचा हक्क मिळवून दिला, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मुख्यमंत्री सावंत यांनी काँग्रेसमधील महिला नेत्यांनाही या मुद्द्यावरून धारेवर धरले. काँग्रेसमधील महिला नेत्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला जाब विचारला पाहिजे आणि त्यांच्याकडून उत्तरदायित्व मागितले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसच्या काळात महिलांच्या प्रश्नांकडे केवळ दुर्लक्ष करण्यात आले, असा दावा करत त्यांनी आगामी निवडणुकीत जनतेने विचारपूर्वक कौल देण्याचे आवाहन केले.

या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाचे महिला धोरण आणि काँग्रेसच्या 'अन्याय'कारक इतिहासावर प्रकाश टाकत मतदारांना साद घातली आहे. काँग्रेसने केवळ आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजपनेच काम केले, हा संदेश त्यांनी या माध्यमातून पोहोचवला.

भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विरोधी पक्षांवर महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. महिला आरक्षण विधेयकाला (नारी शक्ती वंदन अधिनियम) विरोध करून विरोधकांनी महिलांच्या प्रगतीत अडथळा निर्माण केला असून हा त्यांचा विश्वासघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने यापूर्वीही अशा कायद्यांना विरोध करून महिला सक्षमीकरणाच्या विरोधातच भूमिका घेतल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा