मुंबई-गोव्यासह चार राज्यांत छापे; आतापर्यंत तब्बल २७ संशयितांना ठोकल्या बेड्या. ६० लाखांचा मुद्देमाल जप्त.

मुंबई/पणजी: ऑनलाइन सट्टेबाजीच्या दुनियेत स्वतःचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या आणि गेल्या अडीच वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या बाबू खेमानी याच्या अखेर मुसक्या आवळण्यात रायपूर पोलिसांना यश आले आहे. मुंबई आणि गोवा येथे एकाच वेळी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी या टोळीचा मास्टरमाइंड बाबू खेमानी याच्यासह सात प्रमुख आरोपींना अटक केली. या कारवाईत गोवा येथील एका ऑनलाइन पॅनेलचा पर्दाफाश करण्यात आला असून, संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण २७ जणांना अटक करण्यात आली असून, चार राज्यांत पसरलेले हे सट्टेबाजीचे जाळे पोलिसांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.

मास्टरमाइंड बाबू खेमानी हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या नावाखाली हाय-प्रोफाईल लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असे. तो आपला भाऊ करण खेमानी याच्यासोबत मिळून ३ स्टंप्स, रेड्डी ग्रुप, बजरंग ग्रुप, मेट्रो ६५, डायमंड मास्टर आणि ५५ एक्सचेंज यांसारखे ऑनलाइन सट्टा पॅनेल चालवत होता. सुरुवातीला मेट्रो आणि कलर ७७७ यांसारख्या ॲप्सवरून त्याने हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला होता. मात्र, पोलिसांचा दबाव वाढताच जुने ॲप्स बंद करून तो नव्या नावांनी सट्ट्याचे पॅनेल चालवू लागला होता. विशेषतः आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या काळात या सट्टेबाजीला उधाण येत असे आणि देशभरातील बुकीज व एजंट्समार्फत तो लोकांपर्यंत आयडी आणि पॅनेल पोहोचवत असे.

या प्रकरणाचा धागा १३ एप्रिल रोजी रायपूरमधील रेल्वे स्थानक परिसरातून हाती लागला. स्थानिक पोलिसांनी रात्री गस्तीदरम्यान एका संशयिताला कारमध्ये बसून ऑनलाइन सट्टा खेळताना रंगेहात पकडले. त्याच्या चौकशीतून या मोठ्या रॅकेटची माहिती समोर आली. त्यानंतर अँटी क्राईम आणि सायबर युनिटच्या पथकाने ओडिसा आणि महाराष्ट्रसह इतर राज्यांत शोधमोहीम तीव्र केली. पोलीस उपायुक्त (गुन्हे आणि सायबर) स्मृतिक राजनाला यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आणि गोवा येथे एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. मुंबईतून बाबू खेमानीसह रोहित सिंह आणि विशाल कश्यप यांना ताब्यात घेण्यात आले, तर गोवा येथील ऑनलाइन पॅनेलवर कारवाई करून लक्ष्मण ढोबरे, आशिष जाधव, रणजीत कुमार पासवान आणि वैभव खंडेलवाल या चार संशयितांना अटक करण्यात आली.

या टोळीकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत ६० लाख रुपयांहून अधिक आहे. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन, एलईडी टीव्ही, वाय-फाय राउटर, हिशोबाच्या वह्या, रोख रक्कम आणि एक आलिशान बीएमडब्ल्यू कार यांचा समावेश आहे. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, आरोपींनी सट्टेबाजीच्या व्यवहारांसाठी 'म्यूल' बँक खात्यांचा वापर केला होता. ही खाती केवळ २० ते ३० हजार रुपयांत भाड्याने घेतली जात होती आणि त्यावरून कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत.
![]()
बाबू खेमानीच्या विदेश वाऱ्याही आता पोलिसांच्या रडारवर आहेत. तो २०११ पासून दुबई आणि थायलंड येथे अनेकदा गेला असून, त्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासले जात आहेत. याआधीही त्याच्या भावावर आणि स्वतः बाबूवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना कोठडीत घेतले असून, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
