साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

श्री लईराई जत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज, तर आश्वे- मांद्रेत कॉटेजना आग लागून हानी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : शिरगावच्या श्री देवी लईराई जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. आश्वे मांद्रेत कॉटेजना आग लागून कोट्यवधीची हानी झाली. ७७ कोटी रुपयांची सायबर फसवणूक प्रकरणी गोव्यातून ९ जणांना अटक करण्यात आली. याशिवाय अपघाती मृत्यू, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

साखळीतील तरुणीचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू

सांगे तालुक्यातील काजूर-केपे येथे मित्रांच्या एका पार्टीदरम्यान साखळी येथील तन्वी घाडी (२२) या तरुणीचा गोळी लागून मृत्यू झाला. याप्रकरणी साखळी येथीलच श्वेत गावडे (२२) या तरुणावर आरोप असून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

भिरोंडा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

सत्तरी तालुक्यातील नद्यांमध्ये आंघोळ करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या बुडून मृत्यूच्या घटना सातत्याने घडत आहेत. रविवारी भिरोंडा येथील पंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या नदीत मित्रांसह आंघोळीसाठी उतरलेल्या गोवा वेल्हा येथील रजत काणकोणकर (२१) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

वरिष्ठ व्यवस्थापकावर ६४ लाखांच्या अफरातफर प्रकरणी गुन्हा दाखल

कॅनरा बँकेच्या करंझाळे शाखेतील वरिष्ठ व्यवस्थापक रजत त्रिपाठी याच्याविरुद्ध ६४ लाख २५ हजार ५०० रुपयांच्या बँक निधीचा अपहार केल्याप्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक अरुण कुमार ए. जी. यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला.


कार-मालवाहू ट्रकच्या अपघातात कारचालक जखमी

सुकेकुळण धारगळ येथे अल्टो कार आणि मालवाहू ट्रक यांच्यात अपघात होऊन अपघातात अल्टो कार चालक गंभीर जखमी झाला. तसेच गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जखमी कार चालकाला सुरुवातीला म्हापसा येथील आझीलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गोमेकॉत हलवण्यात आले.

सोमवार

गोळीबारात तरुणीचा मृत्यू; संशयित श्वेतला पोलीस कोठडी

सांगे तालुक्यातील काजूर येथे मित्रांच्या पार्टीदरम्यान चेष्टा मस्करीत रायफलमधून गोळी झाडल्याने एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संशयित श्वेत गावडे याला केपे पोलिसांनी अटक करून केपे प्रथमवर्ग न्यायालयासमोर सोमवारी उभे केले. न्यायालयाने संशयित श्वेतची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.


हळदोणेत घरावर झाड कोसळून पाच जखमी

हळदोणा येथील कोठारभाट भागात एका घरावर आंब्याच्या झाडाची मोठी फांदी कोसळल्याने पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये एक वृद्ध आजी आणि दीड वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. सर्व जखमींवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भरधाव ट्रकने दोन कामगारांना उडवले

पर्वरी येथील एससीईआरटी इमारतीजवळ बंद रस्त्यातून चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक बसल्यामुळे एक पादचारी कामगार ठार झाला, दुसरा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. दोन्ही​ कामगार रस्ता ओलांडत असताना हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

मंगळवार

७७ कोटी रुपयांची सायबर फसवणूक : गोव्यातून ९ जणांना अटक

देशभरात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसाच्या सीआयडी क्राईमच्या ‘सायबर सेंटर ऑफ एक्सलन्स’ने गोवा आणि गुजरात राज्यांत तीन ठिकाणी छापे टाकून तब्बल ७७ कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित आंतरराज्य ‘म्युल बँक अकाऊंट’ रॅकेटचा पर्दाफाश केला. गोव्यातून रॅकेटचा मुख्य सूत्रधार जितू ठक्करसह ९ जणांना, तर एकूण १६ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

करमळीत बनावट कॉल सेंटरवर छापा; ७ जणांना अटक

सायबर गुन्हे शाखेने तिसवाडी तालुक्यातील करमळी येथे भाड्याच्या बंगल्यात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून ७ जणांना अटक केली. अमेरिकेच्या नागरिकांची फसवणूक करून मोठी रक्कम उकळण्यात येत होती.

म्हापशात विजेचा धक्का लागून एसी मेकॅनिक ठार

खोर्ली-म्हापसा येथे वातानुकुलित संच (एसी) बसवताना विजेचा धक्का लागून धनंजय गुप्ता (२९, रा. मूळ उत्तर प्रदेश) या एसी मेकॅनिकचा दुर्दैवी मृत्यू झाला. धनंजय गुप्ता हा एका भाड्याच्या घरात एसी बसवण्याचे काम करत होता. भिंतीला पाडलेल्या भोकामध्ये पुटी भरत असताना त्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाला.

बुधवार

कदंब पठारावरील बंगल्यात चोरी; १० लाखांचे दागिने लंपास

गोवा-बेळगाव या महामार्गाच्या जुने गोवा बायपासवरील कदंब पठार परिसरात अज्ञातांनी एका तीन मजली बंगल्यात चोरी करून सुमारे ८ ते १० लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

दोनापावला, म्हापसा दरोड्यांतील आरोपी दिल्लीत जेरबंद

गेल्या काही महिन्यांपासून गोवा, कर्नाटक आणि दिल्लीसह अनेक राज्यांत चोऱ्या करून फरार झालेल्या बांगलादेशी दरोडेखोरांच्या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सहा अट्टल दरोडेखोरांना अटक केली असून, हे सर्वजण गोव्यातील म्हापसा आणि दोनापावला येथे झालेल्या मोठ्या दरोड्यांच्या प्रकरणांत ‘मोस्ट वॉन्टेड’ होते.


म्हापशात ‘हीट अॅण्ड रन’ अपघातात वयोवृद्ध दुचाकीस्वार जखमी

कामरखाजन म्हापसा येथे पेडे जंक्शनजवळ सर्व्हिस रोडवर हीट अॅण्ड रन अपघातात दुचाकीस्वार पीरसाब ख्वाजा (६०, रा. थिवी) हे गंभीर जखमी झाले. स्कुटरला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढलेल्या कारचालकाला विर्नोडा येथे पोलिसांनी पकडले. संशयित कारचालक वसिम मुल्ला (२४, रा. सांगली) याला म्हापसा पोलिसांनी अटक केली.

गुरुवार

आश्वे मांद्रेत कॉटेजना आग लागून कोट्यवधीची हानी

आश्वे-मांद्रे येथील श्री देव आजोबा मंदिराशेजारी असलेल्या 'दलाल बीच रिसॉर्ट'मधील आलिशान कॉटेजेसना भीषण आग लागली. या दुर्घटनेत ६ ते ७ कॉटेजेस जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने, आगीच्या वेळी कॉटेजेसमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

‘३२ एन्ड अव्हेन्यू ग्रुप’च्या मालमत्तांवर ‘ईडी’चा छापा

मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ३२ एन्ड अव्हेन्यू ग्रुप आणि या ग्रुपचे प्रवर्तक- संचालक अनुभव शर्मा, ध्रुव शर्मा व इतरांशी संबंधित सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने गोव्यासह दिल्ली (एनसीआर), जयपूर आणि मुंबईतील सात ठिकाणांवर छापा टाकला. छाप्यात अडीच कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


वाठादेव-डिचोलीत आंघोळीसाठी गेलेल्या धोंडाचा मृत्यू

शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाचे वेध लागले असतानाच, डिचोली तालुक्यातील वाठादेव-सर्वण येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सोवळे व्रत पाळणाऱ्या दामोदर उर्फ अभिषेक दलपत नाईक (२३, रा. काजीवाडा, विठ्ठलापूर-साखळी) या धोंडाचा पाणवठ्यावर अंघोळ करताना मृत्यू झाला.

शुक्रवार

कैऱ्या काढताना हाय-टेंशन वायरचा स्पर्श होऊन महिलेचा मृत्यू

कैऱ्या काढण्याच्या नादात एका महिलेला आपल्या प्राणास मुकावे लागल्याची हृदयद्रावक घटना कुडचडे येथील तिळामळ परिसरात घडली. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हाय-टेंशन वीज वाहिनीचा धक्का लागल्याने नोकील ऑलिवेरा या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

म्हापशात मॉडीफाईड सायलेंसरच्या सहा बुलेट जप्त

म्हापसा शहर परिसरात मॉडीफाईड सायलेंसरचा वापर करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या सहा बुलेटस्वारांविरुद्ध म्हापसा वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. जप्त केलेल्या या बुलेट मोटारसायकल मालकांना प्रत्येकी १० हजारांचा दंड म्हापसा न्यायालयाने ठोठावला. तसेच यापुढे कायद्याचे उल्लंघन झाल्यास दुचाकीची नोंदणी रद्द करण्याचा इशारा न्यायालयाने संबंधितांना दिला.

चिखली येथील वळणावर कंटेनर उलटला

चिखली येथील अस्मा बार अँड रेस्टॉरंटसमोरच्या वळणावर कंटेनर उलटला. सुदैवाने कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला. मात्र, कंटेनरमुळे तेथील एका वीजखांबाचे नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

शनिवार

केपे येथे बंद घरात आढळले माय-लेकीचे मृतदेह

केपे येथे एका बंद घरामध्ये माय-लेकीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. अल्का दत्ताराम शिरवईकर (७७) आणि अनार दत्ताराम शिरवईकर (४२) असे या दोघींचे नाव आहे. घरात त्या दोघीच राहत होत्या. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

वागातोर येथे विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

वागातोर येथे विहिरीत पडून एका ३७ वर्षीय मणिपुर येथील युवकाचे निधन झाले. कपडे धुत असताना तोल जाऊन संबंधित युवक विह‌िरीत पडला. युवक विहिरीत पडल्याची माहिती मिळताच म्हापसा अग्न‌िशमन दलाचे जवान घटनास्थळी धावले. मात्र; तोपर्यंत युवक मृत्यू पावला होता.

कळंगुट खुनातील फरार आरोपींना छत्तीसगडमधून अटक

कळंगुट येथील तिवायवाडा येथे झालेल्या राजभर रविनारायण या युवकाच्या खून प्रकरणातील फरार आरोपी आदित्य शशिकांत प्रसाद व भावेश भोजाराम साहू यांना पोलिसांनी छत्तीसगडमधून अटक केली आहे.

लक्षवेधी

शिरगावच्या श्री देवी लईराई जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. जत्रोत्सवादरम्यान होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

वस्तवाडा-कुडचडे येथील आपल्या कुटुंबियांसोबत खणगिणी-बेतूल येथे आंघोळीसाठी ओहळात उतरलेल्या श्लोक नाईक (१०) या भावाला बुडताना वाचवायला गेलेल्या सानिका नाईक (१७) या बहिणीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात २१ हजारांचा २१ ग्रॅम गांजा सापडला आहे. याप्रकरणी तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीनुसार कोलवाळ पोलिसांनी अज्ञात कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक भानुदास पेडणेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सांगे तालुक्यातील एका सोसायटीत दूध संकलन आणि पशुखाद्य विक्रीच्या व्यवहारांत आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी पोलिसांनी महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. संशयित विंदा वेळीप यांनी कर्तव्यात कसूर करून सुमारे १,६२,९१२ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.