यंदा गोमंतकीयांचे देश सोडण्याचे प्रमाण घटले

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाची माहिती : पासपोर्ट सरेंडरचे प्रमाण २६ टक्क्यांनी, तर रद्दच्या प्रमाणात ३३ टक्क्यांनी कमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 11:45 pm
यंदा गोमंतकीयांचे देश सोडण्याचे प्रमाण घटले

समीप नार्वेकर
पणजी : गोव्यातील नागरिकांचे देश सोडण्याचे प्रमाण यंदा कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये पासपोर्ट सरेंडर (परत जमा) करण्याचे प्रमाण २६ टक्क्यांनी घटले असून, पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रकरणांमध्येही ३३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. ही माहिती पणजी येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने दिली आहे.प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत एकूण २४,३७८ गोमंतकीयांनी आपले पासपोर्ट सरेंडर केले आहेत. दुहेरी पासपोर्ट बाळगणे किंवा भारतीय नागरिकत्व असताना पोर्तुगालमध्ये जन्म नोंदवण्याच्या कारणांमुळे ९३७ जणांचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.
‍‍‍गेल्या दोन वर्षांत देश सोडणाऱ्यांच्या आकड्याने उच्चांक गाठला होता, मात्र आता हे प्रमाण ओसरताना दिसत आहे. २०२४ मध्ये ३,८७४ गोमंतकीयांनी पासपोर्ट सरेंडर केले होते, २०२५ मध्ये हा आकडा घटून २,८३८ वर आला आहे. तर २०२४ मध्ये ३७२ पासपोर्ट रद्द करण्यात आले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ३१२ इतकी खाली आली आहे.
वर्ष २०१६ ते २०२० दरम्यान पासपोर्ट सरेंडर करण्याचे प्रमाण कमी होत गेले होते. २०१६ मध्ये २,६६२ जणांनी पासपोर्ट सरेंडर केला होता, तर २०२० मध्ये हा आकडा ९२४ वर आला. मात्र २०२१ पासून पुन्हा वाढ होऊ लागली आणि २०२४ मध्ये सर्वाधिक ३,८७४ पासपोर्ट सरेंडर करण्यात आले. आता २०२५ मध्ये पुन्हा एकदा यात घट दिसून येत आहे.
पासपोर्ट रद्द प्रकरणांमध्ये २०१६ ते २०२२ दरम्यान संख्या तुलनेने कमी होती. २०१६ मध्ये केवळ ४ प्रकरणे होती, तर २०२२ पर्यंत ही संख्या ९ ते २ दरम्यान होती. मात्र २०२३ मध्ये अचानक वाढ होऊन १२२ प्रकरणे नोंदवली गेली आणि २०२४ मध्ये ती वाढून ४७२ पर्यंत पोहोचली. २०२५ मध्ये मात्र ही संख्या कमी होऊन ३१२ झाली.