'इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅन'नुसार संपूर्ण जत्रा परिसराची सहा झोनमध्ये विभागणी. कसे असेल नियोजन, वाचा.

पणजी : शिरगाव येथील प्रसिद्ध श्री देवी लईराई जत्रोत्सवाच्या काळात कायदा, सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जत्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या होमकुंड विधीवेळी होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, डिचोलीचे उपविभागीय दंडाधिकारी शुभम नाईक यांनी 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३' च्या कलम १६३ अंतर्गत होमकुंड परिसरात कडक निर्बंध लागू केले आहेत. या आदेशानुसार, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जत्रा क्षेत्रातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, २१ एप्रिल रोजी होणाऱ्या या जत्रेला गोवा आणि इतर राज्यांतून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी होणाऱ्या होमकुंड विधीवेळी गर्दीवर नियंत्रण मिळवणे आणि आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवणे हे मोठे आव्हान असते. उत्तर गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या 'इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅन'नुसार, संपूर्ण जत्रा परिसर सहा झोनमध्ये विभागण्यात आला आहे. या नियोजनाचा भाग म्हणून, अधिकृत स्टॉल्स वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल्स आणि स्टॉल्सना या ठराविक काळात कोणताही व्यवसाय, स्वयंपाक किंवा मालाची साठवणूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.
श्री लईराई संस्थानने सादर केलेल्या यादीनुसार, पात्र स्टॉलधारकांना अटींसह 'सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) देण्यात आले आहे. या अधिकृत विक्रेत्यांनाही विद्युत सुरक्षा, अग्निसुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. अनधिकृतपणे स्टॉल्स उभारणाऱ्यांवर किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 'भारतीय न्याय संहिता २०२३' च्या कलम २२३ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हे 'एनओसी' केवळ मंजूर आराखड्यातील स्टॉल्सपुरते मर्यादित असून, जागेचा विस्तार, बदल किंवा अतिक्रमण करण्यास सक्त मनाई आहे. तसेच, मंजूर संख्येपेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही. सर्व स्टॉलधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅन आणि संबंधित विभागांच्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. रस्ते, पादचारी मार्ग किंवा आपत्कालीन मार्गांवर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
तात्पुरती वीज जोडणी केवळ विद्युत विभागाच्या तपासणीनंतरच दिली जाईल. अनधिकृत किंवा धोकादायक वायरिंग आढळल्यास वीजपुरवठा तत्काळ खंडित केला जाईल. अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, ज्वलनशील किंवा धोकादायक वस्तू ठेवण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास दिलेले 'एनओसी' रद्द करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी डिचोलीच्या मामलेदारांच्या नेतृत्वाखाली एक संयुक्त पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकामध्ये पोलीस, अग्निशमन दल, वीज विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिरगाव ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. जत्रोत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला स्थानिकांनी आणि देवस्थान समितीने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणतेही तात्पुरते बांधकाम करण्यासाठी यापूर्वीच लेखी परवानगी अनिवार्य करण्यात आली असून, विनापरवाना उभारलेल्या बांधकामांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.