आयपीएल क्रिकेट बेटिंगच्या वादातून झाला होता गुजरातच्या युवकाचा खून

पणजी : गोव्यातील (Goa) कळंगुट (Calangute) येथे घडलेल्या राजभर रामदर्शनभाई (वय २७, गुजरात) यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोघांना छत्तीसगड येथे अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आदित्य प्रसाद आणि भावेश साहू अशी आहेत. एक गट आयपीएल क्रिकेटच्या बेटिंगसाठी (IPL Cricket betting) गोव्यात आला होता. त्यावेळी झालेल्या वादातून हे खूनप्रकरण घडले होते.
या गटामध्ये वाद झाल्यानंतर पाठलाग करून राजभर रामदर्शनभाई याच्यावर हल्ला करून २८ मार्च रोजी त्याचा खून करण्यात आला होता. खून प्रकरणानंतर संशयित पळून गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच मुख्य संशयिताला अटक केली होती. उर्वरित संशयित फरार झाले होते.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छत्तीसगडमध्ये कारवाई करत आदित्य प्रसाद आणि भावेश साहू यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी आणखी दोघांना अटक केल्याने; तपासाला अधिक गती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित आरोपी आयपीएल क्रिकेट बेटिंगसाठी गोव्यात आले होते. या बेटिंगच्या व्यवहारातूनच वाद निर्माण होऊन हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास सुरू आहे.