
पणजी : तामिळनाडू ,कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यान तयार झालेले टर्फ व अन्य वातावरण बदलामुळे राज्यात (Goa) १९ ते २१ एप्रिल दरम्यान रोजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या तीन दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर १९ एप्रिल रोजी पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.
शनिवारी राज्यातील उकाडा कायम होता. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील काही भागात सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाची (Goa Rain) नोंद झाली नाही. शनिवारी पणजीत कमाल ३३.६ अंश तर किमान २५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मुरगाव मधील कमाल तापमान ३३.२ अंश व किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहीले. पुढील सहा दिवस राज्यातील किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २१ ते २५ एप्रिल दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात १ ते १८ एप्रिल दरम्यान सरासरी १.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.