जिल्हाधिकार्यांकडून आदेश जारी : २१ ते २४ एप्रिलपर्यंत होणार काम

मडगाव : रावणफोंड, मडगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी २० ते २४ एप्रिलपर्यंत पावर हाउस सर्कल ते रावणफोंड सर्कल व जुन्या रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता ठराविक कालावधीसाठी बंद राहणार आहे. कामा वेळी आवश्यक सुरक्षा नियमांच्या पालनाचे निर्देश जिल्हाधिकार्यांकडून जीएसआयडीसीला दिले आहेत.
मडगाव (Margao) येथील रावणफोंड भागात चारपदरी रेल्वे उड्डाणपुलाचे (Overbridge) बांधकाम अंतिम टप्प्यावर आले आहे. या पुलाच्या ‘गर्डर लाँचिंग’चे काम करण्यासाठी २० ते २४ एप्रिल या कालावधीत ठराविक काळात या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवून अन्य मार्गाने वळवण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी (Collector of South Goa) एग्ना क्लिंटस यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकार्यांकडून जारी आदेशानुसार मडगाव आणि दवर्ली परिसरातून येजा करणार्या वाहनधारकांना त्रास सोसावा लागणार आहे. यातील पावर हाऊस सर्कल ते रावणफोंड सर्कल हा मार्ग पूर्णपणे बंद असेल. तर पावर हाऊस सर्कल ते जुने रेल्वे स्थानक रस्ता सर्कलपर्यंतचा मार्ग सर्वसामान्य वाहतुकीस बंद असेल. परंतु रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना आपत्कालीन स्थितीत जाण्यास मुभा देण्यात आली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि कामाच्या गतीसाठी प्रशासनाने दिवसा आणि रात्री अशा दोन सत्रात कामाचे नियोजन केले आहे. त्यानुसार २० एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत, २१ एप्रिल रोजी सकाळी८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, २१ व २२ एप्रिल रोजी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत, २२ व २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंत, २३ एप्रिल रोजी सकाळी ६.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत व २४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कामांचे नियोजन केलेले आहे.
जिल्हा प्रशासनाने या कामा वेळी गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला नियमांचे पालन करण्यास सांगितलेले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी, पार्किंगच्या नियोजनासाठी वाहतूक मार्शल व सुरक्षा रक्षक तैनात करावे लागतील. वाहनधारकांना लांबूनच रस्ता बंद असल्याची माहिती मिळावी यासाठी मोठे दिशादर्शक लावणे बंधनकारक आहे.
रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ नये याची काळजी घेणे, काम संपताच रस्त्यावरील अडथळे दूर करून रस्ता नियमित वाहतुकीसाठी मोकळा करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद आहे.
या काळात मडगाव आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तरी वाहनधारकांनी प्रशासनाला सहकार्य करत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही आदेशात दिलेला आहे.