
पणजी : गोवा पोलिसाच्या गुन्हा शाखेने कांदोळी परिसरात छापा टाकून गुजरात येथील हिरेंन रामोलिया आणि शब्बीरभाई सय्यद या दोघांना अटक केली. त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीचे ६३० ग्रॅम चरस जप्त केले.
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, कांदोळी परिसरात ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती गुप्तहेरांनी एका अधिकाऱ्याला दिली होती. अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक पथकाने कांदोळी येथील पिंटो वाडो येथे शनिवार १८ रोजी सायंकाळी ४.१९ ते ७.२१ दरम्यान सापळा रचला. त्यावेळी पथकाने गुजरात येथील हिरेंन रामोलिया (३२) आणि शब्बीरभाई सय्यद (४०) या दोघांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.
त्यावेळी त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीचा ६३० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. तसेच २ मोबाईल देखील जप्त करण्यात आले. या प्रकरणी उपनिरीक्षक अमीन नाईक यांनी दोघा संशयिताविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम २०(बी) (ii) (बी) आर डब्ल्यू २९ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयितांना म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.