लोहिया मैदानावर कोकणीप्रेमींचा निर्धार : मराठीला दुसरी राजभाषा करण्याच्या प्रयत्नांना तीव्र विरोध

मडगाव : १९८७ च्या राजभाषा कायद्यानुसार कोकणी हीच गोव्याची एकमेव राजभाषा आहे. तिच्या या अढळ स्थानाला कोणत्याही प्रकारे धक्का लावण्याचा प्रयत्न करणार्या कोणत्याही राजकीय पक्षाला आगामी काळात धडा शिकवण्यात येईल, असा निर्धार कोकणीप्रेमींनी लोहिया मैदानावरील जाहीर सभेत केला.
राज्याची स्वतंत्र ओळख आणि अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी भाषा टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे. यासाठी कोकणी हीच राज्याची राजभाषा असून तिच्या संवर्धनासाठी कोणत्याही प्रकारची तयारी असल्याचे सभेत वक्त्यांनी सांगितले. मडगावच्या लोहिया मैदानावर कोकणी भाषेच्या प्रसारासाठी व संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. या सभेला प्रा. प्रजल साखरदांडे, गायिका हेमा सरदेसाई, केनेडी अफान्सो, फिडॉल परेरा, अॅड. प्रतिमा कुतिन्हो, विशाल नागैरो यांच्यासह इतर मान्यवरांनी भाषणे केली.
‘कोकणी आमची भाषा, आमची ओळख’ या टॅगलाइनखाली कोकणीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जाहीर सभा आयोजित केलेली होती. १९८७चा गोवा राजभाषा कायदा हा एका मोठ्या संघर्षाचा परिणाम आहे. कोकणीमुळेच गोव्याला स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा मिळाला असून तीच गोव्याची खरी ओळख आहे. जो राजकीय पक्ष किंवा संघटना आपल्या जाहीरनाम्यात मराठीला गोव्याची दुसरी राजभाषा करण्याचा प्रयत्न करेल किंवा तसे आश्वासन देईल, अशा पक्षावर गोव्यातील कोकणी भाषिक मतदार पूर्णपणे बहिष्कार टाकतील, असा इशारा या सभेतून देण्यात आला.
या सभेला विविध सामाजिक संस्था, साहित्यिक, कलाकार आणि कोकणीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्लोबल रोमी लिपी अभियान यासारख्या भाषेसाठी कार्यरत संघटनांनीही या सभेला पाठिंबा दर्शवत कोकणीच्या संरक्षणासाठी एकजुटीचे आवाहन केले.
कोकणी हीच गोव्याची एकमेव राजभाषा
कोकणी भाषा ही संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेली स्वतंत्र भाषा असून तिला इतर कोणत्याही भाषेसोबत मर्ज करणे किंवा तिचे अस्तित्व कमी करणे सहन केले जाणार नाही, असा ठराव घेण्यात आला. या सभेने पुन्हा एकदा गोव्याच्या भाषिक आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल, असा इशारा राज्यकर्त्यांना दिला. कोकणी हीच आपली मायबोली असून तिचे रक्षण करणे हे प्रत्येक गोवेकराचे कर्तव्य आहे, असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले.