मुख्यमंत्री डॉ. सावंत : पणजीत परशुराम अवतरण महोत्सवाचे उद्घाटन

पणजी : योग, ध्यानधारणा आणि आध्यात्मिक उपक्रमांच्या बळावर राज्याचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ उंचावण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तरुण पिढी आणि जनतेमध्ये आध्यात्मिक वृत्ती वाढल्यास समाजात शांतता निर्माण होईल, जी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर परशुराम जयंतीनिमित्त पणजीत परशुराम अवतरण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार डिलायला लोबो, आमदार जीत आरोलकर, राष्ट्रीय परशुराम परिषदेचे संस्थापक सुनील भराला, श्रीहरी आठल्ये, अमित नागर आदी उपस्थित होते.
कुंडई तपोभूमीत ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर आध्यात्मिक कार्य सुरू आहे. तसेच जुने गोवे येथे नरेंद्र महाराजांचा मठ सुरू झाला आहे. पर्तगाळ मठातील रामाची मूर्ती आणि सप्तकोटेश्वर मंदिर ही ठिकाणे आध्यात्मिकतेसह पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनत आहेत. हरवळे येथे तीर्थ कॉरिडॉर विकसित होत असून, फर्मागुडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित संग्रहालय उभारले जात आहे. या सर्व प्रकल्पांमुळे राज्यात शांतता, सामाजिक स्वास्थ्य आणि आध्यात्मिक वातावरण वाढीस लागेल. तसेच तीर्थ कॉरिडॉर आणि संग्रहालयामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
मांडवी नदीलगत उभारण्यात आलेला परशुरामाचा पुतळा भविष्यात एक महत्त्वाचे आकर्षण ठरेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान गणेश वंदना, भगवान परशुराम गाथा आणि परशुराम आनंद उत्सव यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता महाआरती आणि लाईट अँड साऊंड शोने झाली. २६ एप्रिलपर्यंत दररोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात पूजा, महाआरती, लाईट अँड साऊंड शो आणि दिलीप कृष्ण भारद्वाज यांचे परशुराम कथा वाचन यांचा समावेश आहे.
परशुराम भूमीची ओळख जपणार
गोव्याची ओळख ‘परशुराम भूमी’ अशी आहे. ही ओळख अधिक दृढ करण्यासाठी माझ्याच सरकारने मांडवी नदीकाठी भगवान परशुरामांचा भव्य पुतळा उभारण्याचे कार्य केले आहे. हा पुतळा भविष्यात गोव्याचे सांस्कृतिक वारसा केंद्र म्हणून ओळखला जाईल.