म्हापसा पालिका आणि पोलिसांच्या कार्यपध्दतीवर साशंकता

म्हापसा : आंगड, म्हापसा (Mapusa) येथील स्व. डॉ. खेमानी (Dr.Khemani) यांचे जीर्णावस्थेत असलेले घर हे धोकादायक म्हणून घोषित केले आहे. या घराच्या आवारात मिलाग्रीस फेस्ताचे स्टॉल्स लावू नयेत, तसेच सार्वजनिक सुरक्षतेसाठी पावले उचलण्याचा आदेश उपजिल्हाधिकार्यांनी दिला होता. मात्र नगरपालिकेने वरील आदेशाला तिलांजली देत घराच्या आवारात स्टॉल्स उभारण्यास परवानगी दिली असून पालिका अधिकार्यांच्या (Muncipality) कार्यपध्दतीवर रहिवाश्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ही घराची इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याने; ती कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी आदेश जारी करत ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती.
सदर इमारतीच्या सभोवती बॅरिकेडस् लावावे, फेस्ताचे स्टॉल्स लावू नये, घराची दुरूस्ती किंवा पाडण्याचे काम हाती घ्यावे, पोलीस गस्त तसेच सार्वजनिक सुरक्षतेसाठी आवश्यक पावले उचलावीत, असे निर्देशही उपजिल्हाधिकार्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’च्या कलम १६३ अंतर्गत पालिका मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना दिले होते.
या इमारतीभोवती त्वरित बॅरिकेड्स लावून लोकांचा वावर रोखण्यात यावे. आगामी मिलाग्रिस फेस्तसाठी या इमारतीच्या परिसरात कोणतेही स्टॉल्स लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. गरज पडल्यास इमारत रिकामी करणे आणि पुढील दुरुस्ती किंवा पाडकामाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.
म्हापसा पोलीस (Mapusa Police) निरीक्षकांना या भागात कडक गस्त घालण्याचे आणि अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यापासून रोखण्याचे निर्देश दिले आहेत. परिसरातील नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकार्यांनी या आदेशाद्वारे केले होते.
दरम्यान, पालिकेने १५ रोजीच फेस्ताच्या फेरीतील स्टॉल्ससाठी अलंकार थिएटर ते सेंट जेरॉम चर्च पर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा स्टॉल्स उभारण्यासाठी संबंधित व्यवसायिकांना जागा मोजून दिली होती. शनिवार १८ रोजी पर्यंत उपजिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार डॉ. खेमानी यांच्या धोकादायक घराच्या आवारात स्टॉल्स उभे राहिले नव्हते. मात्र रविवार १९ रोजी म्हणजेच फेस्ताच्या आदल्या दिवशी डॉ. खेमानींच्या घरालगत तीन स्टॉल्स उभारले गेले. शिवाय घराच्या मोडकळीस आलेल्या जीन्याच्या खाली देखील स्टॉल्सवाल्यांनी आपले सामान ठेवले असून; त्यांचा या ठिकाणी वावर सुरू आहे.
उपजिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार या घराच्या आवारात सार्वजनिक सुरक्षतेसाठी पालिकेने बॅरीकेडस् घातले नाही, किंवा स्टॉल्स उभे राहणार नाहीत याची काळजीही घेतलेली नाही. तसेच म्हापसा पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षेतेसाठी पोलीस गस्त देखील ठेवलेली नसून पालिका तसेच पोलिसांकडून उपजिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन झाले आहे. फेस्ताच्या वेळी याठिकाणी कोणतीही अनुचित दुर्घटना घडल्यास पालिका मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरावे, अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे.