
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई दिलासा (DR) वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, १ जानेवारी २०२६ पासून महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. विद्यमान ५८ टक्क्यांवरून तो आता ६० टक्के झाला आहे. ही वाढ वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी करण्यात आली आहे.
या निर्णयाचा वार्षिक आर्थिक भार सुमारे ६,७९१.२४ कोटी रुपयांचा असून, याचा लाभ देशभरातील सुमारे ५०.४६ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८.२७ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय सातव्या वेतन आयोगाच्या (7th Central Pay Commission) शिफारसीनुसार ठरवलेल्या सूत्रांनुसार घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या खर्चाला काही प्रमाणात आधार मिळणार आहे.