गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असताना रायगड पोलिसांनी संशयिताला ठोकल्या बेड्या; आत्तापर्यंत ९ जणांना अटक

मुंबई: गोरेगाव पूर्व येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित संगीत मैफलीदरम्यान अमली पदार्थांच्या सेवनामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. या प्रकरणातील मुख्य दुवा आणि अमली पदार्थांचा प्रमुख पुरवठादार मानल्या जाणाऱ्या २१ वर्षीय आयुष विकी साहित्य याला पोलिसांनी अटक केली आहे. आयुष हा उल्हासनगरचा रहिवासी असून, तो गोव्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे मुंबई आणि रायगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.

११ एप्रिल रोजी नेस्को मैदानावर 'ॲसिड स्टॉर्म' इंडिया टूर अंतर्गत एका 'टेक्नो वेअरहाऊस रेव्ह पार्टी'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला २० ते २२ विद्यार्थ्यांचा एक गट उपस्थित होता. त्यापैकी दोन २४ वर्षीय विद्यार्थ्यांनी मद्य आणि 'एक्सटसी' (MDMA) गोळ्यांचे सेवन केले होते. दुसऱ्या दिवशी या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य एक विद्यार्थी अद्याप दक्षिण मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून त्यानेच या विद्यार्थ्यांना ड्रग्जचा पुरवठा केला होता. तपासात असेही समोर आले आहे की, आयुषने बाऊन्सर आणि सुरक्षा रक्षकांना प्रत्येकी १ हजार रुपयांची लाच देऊन विनातिकीट बेकायदेशीररीत्या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश मिळवला होता.
या प्रकरणातील इतर आरोपींसोबत आयुषचे मोठे आर्थिक व्यवहार असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या विनीत गेरलानी याच्या चौकशीत आयुषचे नाव समोर आले होते. विनीतच्या उल्हासनगर येथील घरातून पोलिसांनी ५ एक्सटसी गोळ्या जप्त केल्या आहेत. त्याचे वजन सुमारे ३०५ ग्रॅम असून बाजारभाव २० हजार रुपये आहे. आरोपींचे सुरक्षा रक्षकांशी असलेले लागेबांधे आणि नेस्कोच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा या ड्रग्ज पुरवठ्यात सहभाग आहे का, याचा सविस्तर तपास आता पोलीस करत आहेत.

शनिवारी बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणातील पहिल्या पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर आयुष साहित्य, विनीत गेरलानी आणि आनंद पटेल यांसह इतर चार आरोपींना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून ड्रग्जचा मूळ साठा कुठून आला, याचा शोध घेणे आवश्यक आहे. या संगीत मैफलीच्या सुरक्षेचे कंत्राट 'सेफक्युअर' नावाच्या कंपनीला देण्यात आले होते, त्यांच्या प्रतिनिधींचीही लवकरच चौकशी केली जाणार आहे. या अटकेमुळे मुंबईतील रेव्ह पार्टी आणि अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.