भारताकडून इस्रायल-लेबनॉन युद्धविरामाचे स्वागत

तेहरान/नवी दिल्ली : पश्चिम आशियातील (Western Asia) तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल (Israel) आणि लेबनॉन (Lebanon) यांच्यात १० दिवसांचा युद्धविराम लागू झाला असला, तरी हिझबुल्ला विरोधातील लष्करी कारवाई अद्याप पूर्ण झाली नसल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी शुक्रवारी (१७ एप्रिल २०२६) सांगितले की, लेबनॉनमधील जमिनीवरील मोहीम आणि हिझबुल्लावरील हल्ले यशस्वी ठरले असले, तरी उद्दिष्टे पूर्णपणे साध्य झालेली नाहीत. भारताने (India) इस्रायल-लेबनॉन युद्धविरामाचे स्वागत केले आहे
इस्त्रायलकडून हल्ले थांबल्यास युद्धविरामाचा सन्मान : हिझबुल्ला
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू झालेल्या या १० दिवसांच्या युद्धविरामामुळे संघर्षात काही प्रमाणात शांती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, लेबनॉनच्या सैन्याने इस्रायलवर युद्धविरामाचे (Ceasefire) उल्लंघन करत "आक्रमक कारवाया" केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, हिझबुल्लाने अधिकृतपणे युद्धविराम मान्य केल्याचे स्पष्ट केले नसले, तरी इस्रायलकडून हल्ले थांबल्यास त्याचा सन्मान राखला जाईल, असे संकेत दिले आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनीसाठी फ्रान्स, यूकेची बैठक
या पार्श्वभूमीवर, फ्रान्स आणि युनायटेड किंगडमचे नेते विविध देशांची बैठक घेऊन होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत अमेरिकेचा सहभाग नसणार आहे. दरम्यान, अमेरिकेचे (USA) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिका आणि इराण (Iran) यांच्यात शांतता करार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भारताकडून युद्धविरामाचे स्वागत
भारताने इस्रायल-लेबनॉन युद्धविरामाचे स्वागत केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जैस्वाल यांनी “शांततेकडे टाकलेले प्रत्येक पाऊल भारतासाठी स्वागतार्ह आहे,” असे स्पष्ट केले. तसेच, पश्चिम आशियातील घडामोडींवर भारत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी नमूद केले.एकूणच, युद्धविराम लागू असला तरी तणाव कायम असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणत्या दिशेने जाते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.