रुपयाच्या घसरणीमुळे भारताच्या जीडीपी क्रमवारीत मोठा फेरबदल; आयएमएफचा नवा अहवाल

नवी दिल्ली: जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत वेगाने झेप घेणाऱ्या भारतासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) ताज्या आकडेवारीने चिंतेचे संकेत दिले आहेत. आयएमएफच्या एप्रिल महिन्यातील जागतिक आर्थिक आउटलुकनुसार, भारत आता जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था राहिलेला नसून, ब्रिटनने भारताला मागे टाकत पुन्हा एकदा पाचवे स्थान पटकावले आहे. या बदलामुळे भारत आता सहाव्या क्रमांकावर घसरला असून, जीडीपीच्या मोजणीसाठी बदललेले आधारभूत वर्ष आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन ही या घसरणीची प्रमुख कारणे मानली जात आहेत.
आयएमएफच्या अंदाजानुसार, २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार ४.१५ ट्रिलियन डॉलर्स असण्याची शक्यता आहे. याउलट, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा आकार ४.२६ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, २०२२-२३ मध्ये भारताने ब्रिटनला मागे टाकून पाचवे स्थान मिळवले होते आणि २०२५-२६ पर्यंत भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, ताज्या आकडेवारीने या अपेक्षांना काहीसा लगाम घातला आहे.
या आर्थिक फेरबदलाचे विश्लेषण करताना अर्थतज्ज्ञांनी प्रामुख्याने दोन तांत्रिक मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात जीडीपीचे नवे अंदाज जाहीर केले होते, त्यामध्ये जीडीपी मोजणीचे 'बेस इयर' (आधारभूत वर्ष) बदलले गेले. या सुधारित आकडेवारीमुळे भारताचा नाममात्र जीडीपी जुन्या मालिकेतील ३५७ लाख कोटी रुपयांवरून नवीन मालिकेत ३४५.५ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच मूळ जीडीपीमध्ये सुमारे ४ टक्क्यांची घट दिसून आली आहे. यासोबतच, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात ११ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. सरासरी ८७ रुपये प्रति डॉलर या विनिमय दरामुळे भारताचा जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सच्या खाली राहण्याचा अंदाज आहे.
अन्य एका तज्ज्ञाने सांगितले की, नवीन आधारभूत वर्षामुळे नाममात्र जीडीपी कमी झाला आणि त्यातच रुपयाच्या अवमूल्यनाची भर पडली, परिणामी जागतिक क्रमवारीत हा बदल दिसून आला आहे. दरम्यान, भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंता नागेश्वरन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, बाह्य घटकांमुळे जागतिक क्रमवारीत चढ-उतार होत असले, तरी भारत २०२६-२७ मध्ये ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा सहज पार करेल.
आयएमएफच्या या ताज्या यादीनुसार, ३२.३ ट्रिलियन डॉलर्ससह अमेरिका पहिल्या स्थानावर कायम असून चीन २०.८५ ट्रिलियन डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मनी ५.४५ ट्रिलियन डॉलर्ससह तिसऱ्या, तर जपान ४.३८ ट्रिलियन डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. भारताची सहाव्या क्रमांकावर झालेली ही घसरण तात्पुरती आहे की दीर्घकालीन, हे येणाऱ्या काळातील आर्थिक धोरणे आणि रुपयाच्या स्थैर्यावर अवलंबून असेल. या संदर्भात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.