ट्रम्प म्हणतात इराण युद्ध लवकरच संपेल

लेबनॉन : लेबनॉनमध्ये (Lebanon) इस्रायल आणि हिझबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आळा घालण्यासाठी शुक्रवारी (१७ एप्रिल २०२६) मध्यरात्रीपासून १० दिवसांचा युद्धविराम (ceasefire) लागू करण्यात आला असला, तरी परिस्थिती अद्याप तणावपूर्णच आहे. लेबनॉनच्या सैन्याने इस्रायलवर “आक्रमक कारवाया” केल्याचा आरोप करत युद्धविरामाचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे.
हा तात्पुरता तह इस्रायल (Israel) आणि हिझबुल्ला (Hezbollah) यांच्यातील चकमकी थांबवण्यासाठी तसेच इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाला विराम देण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या काही आठवड्यांतील भीषण युद्धामुळे या भागात मोठे नुकसान झाले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेच्या प्रयत्नांना गती मिळत आहे.
दरम्यान, हिझबुल्लाने अधिकृतपणे युद्धविराम मान्य केला आहे का, याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. मात्र, संघटनेतील एका वरिष्ठ नेत्याने इस्रायलने हल्ले थांबवले तर युद्धविरामाचा आदर केला जाईल, असे संकेत दिले आहेत.
इराणमधील युद्ध लवकर संपेल : ट्रम्प
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणबरोबर शांतता कराराच्या चर्चेत मोठी प्रगती झाल्याचा दावा केला आहे. “इराणमधील युद्ध लवकरच संपेल,” असे सांगत त्यांनी संभाव्य करारासाठी पाकिस्तानमध्ये जाण्याची तयारी दर्शवली आहे. एकूणच, मध्यपूर्वेतील परिस्थिती अजूनही नाजूक असून; युद्धविराम टिकतो का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.