बालेन शाह यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचे लक्ष; भारत-नेपाळ संबंधांना नवी दिशा

चीनची नाराजी वाढण्याची शक्यता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
बालेन शाह यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचे लक्ष; भारत-नेपाळ संबंधांना नवी दिशा

काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान (Prime Minister)  बालेन शाह यांच्या संभाव्य भारत दौऱ्याकडे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले गेले आहे. या दौऱ्याला भारत-नेपाळ संबंधांसाठी नव्या पर्वाची सुरूवात मानली जात आहे. मात्र, चीनकडून त्यावर नाराजी व्यक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षी नेपाळमध्ये झालेल्या जनरेशन-झेड (Gen-Z) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारताने परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत वेळेवर राजकीय बदल ओळखला. या बदलानंतर बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारताने तत्काळ पुढाकार घेत त्यांना अधिकृत दौऱ्यासाठी आमंत्रित केले. २७ मार्च रोजी शपथ घेतल्यानंतरच दिलेले हे निमंत्रण दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

भारताची योग्य वेळी भूमिका

केपी शर्मा ओली यांच्या सरकारविरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनानंतर सत्तांतर झाले. त्यानंतर भारताने (India)  नव्या नेतृत्वाशी संपर्क वाढवत बालेन शाह आणि त्यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाशी (RSP) संवाद साधला. निवडणुकांमध्ये शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने दोन तृतीयांश बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

ओलींच्या काळात तणावपूर्ण संबंध

माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या कार्यकाळात भारत-नेपाळ (India-Nepal) संबंधांमध्ये तणाव वाढला होता. भारतविरोधी भूमिका, वादग्रस्त विधाने आणि कालापानी सीमावादामुळे दोन्ही देशांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. विशेषतः भारताच्या भूभागावर दावा करत तो नेपाळच्या नकाशात समाविष्ट केल्याने संबंध अधिकच बिघडले.

नव्या सरकारकडून संतुलनाची भूमिका

नवीन राजकीय समीकरणात भारताला ओली यांच्या पक्षाचा पराभव अपेक्षित होता, जो प्रत्यक्षात घडून आला. त्यामुळे भारत-नेपाळ संबंध पुन्हा सुधारण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र, भारत आणि चीन (China) या दोन शक्तिशाली देशांदरम्यान असलेल्या नेपाळसाठी संतुलन राखणे ही मोठी कसरत ठरणार आहे.

चीनची नाराजी 

बालेन शाह (Balen Shah)  यांनी निवडणुकीपूर्वीच चीनच्या मदतीने उभारण्यात येणाऱ्या इंडस्ट्रियल पार्क प्रकल्पाला विरोध करत तो रद्द केला होता. या निर्णयामुळे चीनकडून नाराजी व्यक्त झाली होती. तसेच तिबेट आणि तैवान समर्थक हालचालींबाबतही बीजिंगने चिंता व्यक्त केली आहे.

भारत दौऱ्या दरम्यान मोठ्या अपेक्षा

बालेन शाह यांच्या भारत दौऱ्यात नवी दिल्लीकडून काही महत्त्वाच्या सवलती किंवा सहकार्याच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, देशांतर्गत राजकारण लक्षात घेता शाह अतिशय सावध भूमिका घेत असल्याचे दिसते. 

दौरा दक्षिण आशियातील सामरिक संतुलनसाठी महत्त्वाचा 

दरम्यान, परराष्ट्र धोरणात संतुलन राखण्यासाठी शाह यांनी सर्व परदेशी राजदूतांची एकत्रित भेट घेतली. तसेच भारतीय अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर चीनी अधिकाऱ्यांशीही संवाद साधला जात आहे. त्यामुळे भारत दौऱ्यानंतर शाह बीजिंगलाही भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, बालेन शाह यांचा भारत दौरा हा केवळ द्विपक्षीय संबंधांसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियातील सामरिक संतुलनासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


हेही वाचा