मथुरा-वृंदावन येथे बोट उलटून १५ ठार

लुधियाना : सोशल मीडियावर (Social media) वेळ घालवण्यासाठी अनेक तास ‘रील्स’ (Reels) पाहण्याचा छंद अनेकांना आहे. ‘रील्स’ पाहण्याचा हाच छंद एका महिलेचे प्राण वाचवण्यास कारणीभूत ठरला. पंजाबमधील ५५ वर्षीय राजिंदर कौर यांनी मथुरा, वृंदावन येथे घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेतून केवळ सोशल मीडियावर पाहिलेल्या एका ‘रील’ ट्रिकच्या जोरावर स्वतःचा जीव वाचवला. महिला आणि आणखी काहीजण वाचले तरी; या दुर्घटनेत १५ भाविक ठार झाले.
रीलमध्ये पाहिलेली ट्रिक प्रत्यक्षात आणली
मिळालेल्या माहितीनुसार, बोट उलटल्यानंतर पाण्यात पडताच राजिंदर कौर घाबरून न जाता; त्यांना एका रीलमध्ये पाहिलेली ट्रिक आठवली. त्यांनी तात्काळ श्वास रोखून धरला, नाक-तोंड बंद ठेवले, हात सरळ केले आणि पाय हलवत राहिल्या. त्यामुळे पाणी शरीरात जाणे टळले आणि त्या पाण्यावर तग धरू शकल्या. काही वेळातच नावाड्यांनी धाव घेऊन त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
मृत्यूच्या अगदी जवळ गेले पण..
या दुर्घटनेबाबत सांगताना राजिंदर कौर म्हणाल्या, “मी मृत्यूच्या अगदी जवळ गेले होते. पण अचानक मला इन्स्टाग्रामवरील (Instagram) एक रील आठवली. त्यात दिलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळेच माझा जीव वाचला.”
काहीजण दुसऱ्या बोटीत गेले आणि वाचले
घटनेवेळी बोटीत सुमारे ३८ प्रवासी होते. प्रवासादरम्यान अचानक बोट थांबवण्यात आली आणि काहींना दुसऱ्या बोटीत जाण्यास सांगण्यात आले. मात्र काही प्रवाशांनी नकार दिला. दरम्यान, बोटीची धडक एका तरंगत्या पुलाला बसल्यानंतर बोट पुलाच्या दोरीत अडकून उलटली. त्यानंतर पुलाचा काही भाग बोटीवर कोसळल्याने दुर्घटना अधिक भीषण झाली.
बोट उलटून १५ जण ठार; एक बेपत्ता
बोट उलटताच अनेक प्रवासी पाण्यात फेकले गेले. काहीजण बोटीखाली अडकले, ज्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. या दुर्घटनेत १५ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून; एक जण अद्याप बेपत्ता आहे. मृतांमध्ये लुधियाना आणि जगराओं परिसरातील बहुसंख्य प्रवाशांचा समावेश आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील माहिती योग्य प्रकारे वापरल्यास ती जीवनरक्षक ठरू शकते, याची जाणीव या घटनेने करून दिली.