बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा; सम्राट चौधरी पुढील मुख्यमंत्री

बिहारात प्रथमच होणार भाजपचा मुख्यमंत्री

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा; सम्राट चौधरी पुढील मुख्यमंत्री

 पटना : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडत असून; मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)  यांनी आज मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला.

राजीनामा देण्यापूर्वी नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली आणि मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सहकाऱ्यांना कळवला. घटनात्मक प्रक्रियेनुसार मंत्रिमंडळ विसर्जित केल्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. राज्यपाल लेफ्टनंट जनरल सैयद अता हसनैन यांनी हा राजीनामा स्वीकारला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (Samrat Choudhary)  यांची भाजप विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली असून; ते बिहारचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. राज्यात प्रथमच भारतीय जनता पार्टीचा ( BJP)  मुख्यमंत्री सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे केंद्रीय निरीक्षक शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan)  यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी सम्राट चौधरी यांचे अभिनंदन केले आहे. पटना येथील पक्ष मुख्यालयात झालेल्या बैठकीत त्यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.

सम्राट चौधरी लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा १५ एप्रिल रोजी लोकभवन येथे पार पडण्याची शक्यता असून; पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांची उपस्थितीही अपेक्षित आहे.

गेल्या सुमारे २१ वर्षांपासून बिहारच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणाऱ्या नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात नव्या राजकीय पर्वाची सुरूवात होणार आहे.

हेही वाचा