कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारपुढे पुन्हा पेच

बेंगळुरू : कर्नाटकातील (Karnataka) काँग्रेस पक्षात (Congress Party) मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुमारे २५ ते ३० वरिष्ठ आमदारांचे शिष्टमंडळ दिल्लीकडे (Delhi) रवाना झाले आहे. ते पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेऊन मंत्रिपदासाठी आपली मागणी मांडणार आहेत.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व विधानसभा मुख्य सचेतक (chief whip) अशोक पट्टण (Ashok M Pattan) करत आहे. त्यांनी तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या संमतीने हा दौरा आयोजित केला आहे.
दरम्यान, बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण पोटनिवडणुकांनंतर व ४ मे रोजी होणाऱ्या निकालांपूर्वीच हा दौरा होत असल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही आमदार सिद्धरामय्या यांनी उर्वरीत दोन वर्षे मुख्यमंत्रीपदावर कायम राहावे यासाठी पाठिंबा देत असल्याचे मानले जात आहे.
तसेच, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार ( DK Shivakumar) यांच्या गटाकडूनही मुख्यमंत्री बदलाची मागणी पुन्हा जोर धरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर ( G Parameshwara) यांनी मात्र सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट केले आहे.
दिल्लीत हे आमदार एआयसीसीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांची भेट घेणार असून, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjuna Kharge) यांच्या परतण्याचीही ते प्रतीक्षा करणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, मंत्रिपदाची इच्छा असलेल्या आमदारांनी दिल्लीला जाण्यात काहीच गैर नाही. मात्र, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अंतिम निर्णय पक्षाचे उच्च नेतृत्वच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याने सध्याच्या मंत्र्यांना बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक असल्याचे मत या आमदारांनी व्यक्त केले आहे. २०२८ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.