आज मुंबईत राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार

मुंबई : भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज असलेल्या आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने सिनेसृष्टी, संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी झाली आहे. आज संध्याकाळी ४ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रविवारी (१२ एप्रिल २०२६) मुंबईतील (Mumbai) रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच पूर्ण संगीत विश्व, सिनेसृष्टी तसेच त्यांचे जगभरातील चाहते हळहळले. सकाळी ११ वाजता लोअर परेळ येथील त्यांच्या ‘कासा ग्रांदे’ निवासस्थानी सर्वसामान्यांना अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र आनंद यांनी दिली.
आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रातून शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या जाण्याने भारतरत्न लता मंगेशकर यांच्यानंतर आणखी एका उत्तुंग गायिकेला मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
स्वरसम्राज्ञी आशा भोसले या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर ( Lata Mangeshkar) यांच्या धाकट्या बहिण. तब्बल आठ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी १६ हजारांहून अधिक गाणी विविध भाषांमध्ये गायली. मीना कुमारी, मधुबाला, झीनत अमानपासून काजोल, उर्मिला मातोंडकर तसेच दक्षिणेतील पद्मिनी, वैजयंतीमाला यांसारख्या अनेक अभिनेत्रींसाठी त्यांनी आपला आवाज दिला.
त्यांच्या निधनाने भारतीय संगीतसृष्टीतील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अखेरच्या प्रवासाला निघालेल्या या महान गायिकेला आदरांजली वाहण्याबरोबरच त्यांच्या आठ दशकांचा संगीत प्रवास आणि एकूण उज्वल कारकिर्द यालाही चाहत्यांकडून उजाळा दिला जात आहे.