खणगिणी येथे ओहोळात बुडणाऱ्या भावाला वाचवताना जखमी; मोठ्या बहिणीचाही उपचारादरम्यान मृत्यू

कुडचडे येथील नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27 mins ago
खणगिणी येथे ओहोळात बुडणाऱ्या भावाला वाचवताना जखमी; मोठ्या बहिणीचाही उपचारादरम्यान मृत्यू

पणजी : खणगिणी येथील ओहोळात बुडणाऱ्या आपल्या लहान भावाला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सानिका नाईक या १७ वर्षीय तरुणीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बांबोळी येथील गोमेकॉत मृत्यूशी झुंज देणाऱ्या सानिकाने सोमवारी अखेरचा श्वास घेतला. रविवारी या दुर्घटनेत १० वर्षीय श्लोक नाईक याचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आता मोठ्या बहिणीचेही निधन झाल्याने कुडचडे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वस्तवाडा-कुडचडे येथील नाईक कुटुंब रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी खणगिणी येथे गेले होते. सानिका व श्लोक हे दोघे कुटुंबीयांसोबत पाण्यात आंघोळीचा आनंद घेत होते. नदीला आलेल्या भरतीमुळे ओहोळात पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि श्लोक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. आपल्या लहान भावाला डोळ्यादेखत बुडताना पाहून मोठी बहीण सानिकाने कसलाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. दुर्दैवाने, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सानिका देखील बुडू लागली.

कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत चिमुकल्या श्लोकला आणि सानिकाला पाण्याबाहेर काढले, मात्र तोपर्यंत श्लोकची प्राणज्योत मालवली होती. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सानिकाला तातडीने गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण सानिकाला वाचवता आले नाही. अवघ्या २४ तासांच्या अंतराने एकाच घरातील दोन मुले अशा प्रकारे अकाली गेल्याने नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.