वेतनवाढीच्या मुद्द्यावर नोएडात फॅक्टरी कामगारांचे हिंसक आंदोलन; गाड्या जाळल्या, केली दगडफेक

फेज-२ औद्योगिक वसाहतीमधील १० कंपन्यांना सर्वाधिक फटका. जिल्हाधिकाऱ्यांची धावपळ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
41 mins ago
वेतनवाढीच्या मुद्द्यावर नोएडात फॅक्टरी कामगारांचे हिंसक आंदोलन; गाड्या जाळल्या, केली दगडफेक

नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या हजारो फॅक्टरी कामगारांच्या निदर्शनांना सोमवारी सकाळी हिंसक वळण लागले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनानंतर, प्रशासनाकडून दखल न घेतल्याने संतप्त कामगारांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ आणि तोडफोड केली. नोएडाच्या फेज-२ इंडस्ट्रियल एरियामध्ये हा उद्रेक झाला असून, आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करत एक पोलीस वाहन चक्क उलटवून लावले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

या हिंसाचाराची ठिणगी सर्वप्रथम फेज-२ मधील 'मदरसन' कंपनीबाहेर पडली. वेतनवाढीच्या मागणीसाठी सुमारे ५०० कामगार येथे जमा झाले होते, मात्र चर्चा निष्फळ ठरल्याने वाद पेटला. हळूहळू या आंदोलनाचे पडसाद नोएडातील १० औद्योगिक क्षेत्रांमध्ये उमटले. सेक्टर-१, १५, ६२ आणि डीएनडी फ्लायओव्हरसह अनेक महत्त्वाचे रस्ते आंदोलकांनी रोखून धरले. सेक्टर-५७ आणि ८५ मधील कंपन्यांमध्ये घुसून आंदोलकांनी तोडफोड केली, तर अनेक गाड्यांना आगीच्या हवाली केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात पीएसी (PAC) तैनात करण्यात आली असून सर्व मुख्य मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.


या तणावाच्या पार्श्वभूमीवर नोएडाच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांनी कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत तातडीची बैठक घेतली. प्रशासनाने आश्वासन दिले आहे की, प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत वेतन दिले जाईल आणि महिलांसाठी तक्रार निवारण समित्या स्थापन केल्या जातील. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक (DGP) राजीव कृष्ण आणि ए़डीजी अमिताभ यश स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. हिंसाचारासाठी भडकवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन कामगारांशी संवाद साधून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.


हेही वाचा