नाशिक : प्रेमाचे नाटक, लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, बनवला धर्मांतरासाठी दबाव

नाशिकच्या 'एमएनसी'त धर्मांतराचे मोठे रॅकेट; नामांकित आयटी कंपनीचे युनिट बंद. प्रकरणाचा तपास एटीएस, आयबीकडे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th April, 04:53 pm
नाशिक : प्रेमाचे नाटक, लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, बनवला धर्मांतरासाठी दबाव

नाशिक: नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांच्या शोषणाचे आणि सक्तीच्या धर्मांतराचे अत्यंत भयानक रॅकेट उघडकीस आल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. कंपनीत नोकरी करणाऱ्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यांचे लैंगिक शोषण करणे आणि त्यानंतर अश्लील व्हिडिओंच्या जोरावर धर्मांतरासाठी दबाव टाकणे, असा संतापजनक प्रकार गेल्या काही वर्षांपासून येथे सुरू होता. याप्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून, नाशिक पोलिसांनी एक एचआर मॅनेजर व सहा टीम लिडर्सना अटक केली आहे. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे संबंधित कंपनीने आपले नाशिकमधील युनिट कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तपासातून समोर आलेली माहिती अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. कंपनीतील काही नराधम हिंदू मुलींना कामाच्या बहाण्याने नको तिथे स्पर्श करणे, मीटिंगच्या वेळी छेडछाड करणे आणि लॉबीमध्ये विनयभंग करणे असे प्रकार करत होते. इतकेच नव्हे तर, हिंदू देव-देवतांचा अपमान करून आणि पौराणिक ग्रंथांचा विकृत अर्थ लावून महिलांच्या धार्मिक श्रद्धेवरही घाव घातला जात होता. सुरुवातीला अनेक महिलांना हे केवळ त्यांच्यासोबतच घडत असल्याचे वाटले, मात्र कालांतराने हे एक संघटित रॅकेट असल्याचे आणि केवळ हिंदू मुलींनाच लक्ष्य केले जात असल्याचे उघड झाले. फोटो आणि व्हिडिओ काढून कुटुंबाला सांगण्याची भीती घालत तरुणींना धर्मांतरासाठी भाग पाडले जात होते.

या प्रकरणाची व्याप्ती पाहता नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. तसेच, यामागे काही आंतरराष्ट्रीय शक्ती किंवा दहशतवादी कारवायांचे धागेदोरे असण्याच्या संशयावरून एनआयए (NIA), एटीएस (ATS) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) या केंद्रीय यंत्रणाही आता तपासात सामील झाल्या आहेत. कंपनीच्या एचआर मॅनेजर अश्विनी चैनाणी हिच्यावरही तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका असून ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कंपनी बंद झाल्यामुळे तेथील निष्पाप कर्मचाऱ्यांना मुंबई किंवा पुण्यातील प्रकल्पांत स्थलांतरित व्हावे लागणार असून, नाशिकच्या कॉर्पोरेट जगतात या घटनेमुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा