ब्रह्माकरमळ - ब्रम्हदेव

ब्रम्हदेवाची मूर्ती करमळीतून आणली होती. त्यामुळे चांदिवडे हा गाव ब्रम्हाकरमळी या नावाने ओळखला जाऊ लागला. ब्रम्हाकरमळी मंदिरातील मूर्ती अप्रतिम कोरीवकाम केलेली आहे. कदंबकालीन शिल्प असलेली चतुर्मूख मूर्ती जवळजवळ सहा फूट उंच आहे.

Story: जत्रा |
3 hours ago
ब्रह्माकरमळ - ब्रम्हदेव

सह्याद्रीच्या गगनचुंबी पर्वत शिखरांनी वेढलेला, झाडे-झुडपे वृक्ष-वेलींनी सदाहरीत बनलेला, पाण्याच्या झुळझुळ आवाजाने व पक्ष्यांच्या मधूर गाण्याने कान तृप्त करणारा उत्तर गोव्यातील सत्तरी हा तालुका. या तालुक्यातील 'ब्रम्हाकरमळी' या गावात गोमंतकातील एकमेव असे ब्रह्मदेवाचे विलोभनीय मंदिर पहावयास मिळते. 

इतिहास तज्ञांच्या माहितीनुसार ही मूर्ती कदंबकालीन असल्याचे सांगण्यात येते. पोर्तुगीज राजवटीपूर्वी गोव्यावर कदंब, मराठा, आदिलशहा यासारख्या घरण्यांनी राज्य केले. कदंबांच्या काळात तर हिंदू देवदैवतांना सुगीचे दिवस लाभले. या काळात त्यांनी अनेक मंदिरे बांधली. ही मंदिरे जमीनदोस्त करण्याचे काम पोर्तुगीजांनी केले. स्थानिक लोक धर्मांतराला बळी न पडता आपले देव पोर्तुगीजांकडून भ्रष्ट होऊ नये म्हणून मूर्ती घेऊन पलायन करू लागले.

याच काळात जुन्या गोव्यातील करमळी गावात असलेले ब्रम्हदेवाचे मंदिर उद्ध्वस्त केले. आपल्या देवांसाठी प्राणाचीही पर्वा न करता एका गावकऱ्याने त्यातील मूर्ती 

घेऊन लपत छपत सत्तरी गाठली. त्यावेळी सत्तरी तालुका राण्यांच्या अधिपत्याखाली असल्याने हिंदू देवदैवतांसाठी सुरक्षित होता. चांदिवडे गावात पोहोचताच त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून मूर्ती खाली ठेवली. विश्रांतीनंतर पुढे जाण्यासाठी मूर्ती उचलू लागला पण ती कशीच उचलेना. शेवटी त्याच ठिकाणी त्यांची स्थापना करून मंदिर उभारण्यात आले. 

ब्रम्हदेवाची मूर्ती करमळीतून आणली होती त्यामुळे चांदिवडे हा गाव ब्रम्हाकरमळी या नावाने ओळखला जाऊ लागला. विश्वाची उत्पत्ती करणारा ब्रम्हा हा विष्णूच्या नाभी कमलातून जन्मलेला विष्णुपुत्र आहे. भगवान विष्णूच्या आदेशानुसार सर्व सृष्टी निर्माण करण्याचे कार्य ब्रम्हदेवाने केल्यामुळे त्याला सृष्टी निर्माता म्हटलेले आहे.

ब्रह्माकरमळी मंदिरातील मूर्ती अप्रतिम कोरीवकाम केलेली आहे. कदंबकालीन शिल्प असलेली चतुर्मूख मूर्ती जवळजवळ सहा फूट उंच आहे. ब्रम्हदेवाचे वाहन हंसपक्षी. त्यामुळे हंसपक्षाची जोडी देवांच्या पायाजवळ कोरलेली आहे. सावित्री व गायत्री या त्याच्या पत्नीच्या प्रतिमा ब्रम्हदेवाच्या दोन्ही बाजूला कोरलेल्या दिसतात. मूर्तीच्या दर्शनी उजव्या हातात स्त्रुवा (पळी), डाव्या हातात अज्यास्थळी (कमंडलू), तर मागील डाव्या हातात पुस्तक (ग्रंथ) आहे. 

मंदिरातून वर्षभर निरनिराळे उत्सव साजरे केले जातात. दर सोमवारी ग्रामस्थांतर्फे भजनाचा कार्यक्रम असतो. विजयादशमीच्या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम असतो. शिमगोत्सवाच्यावेळी होळीपूजन, तुलसी विवाह असे उत्सव साजरे केले जातात. मार्गशीर्ष वद्य तृतीयेच्या दिवशी ‘ब्रम्होत्सव' उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 

या  दिवशी   शेकडो  लोक   देवाचे  दर्शन  घेतात.  दुपारी  महानैवेद्याचा कार्यक्रम असतो. ब्रम्हाकरमळी  गावात  शांतादुर्गा, सातेरी मंदिर, श्री दत्तमंदिर, जल्मीदेव, आजोबा देव अशी किती तरी धार्मिक स्थळे पहावयास मिळतात.  

सामाजिक-सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या गावातील लोक परंपरागत लोककलातून सोकारत, घोडेमोडणी, चोरोत्सव, करवल्या यासारखे उत्सव साजरे करून आपली संस्कृती वैभवसंपन्न करतात.

हेही वाचा