हल्ल्यासाठी भूभाग वापरल्याचा ठपका ; इराणने नोंदवला तीव्र निषेध.

तेहरान : मध्य पूर्वेतील युद्धाच्या ठिणगीने आता एक नवे राजनैतिक वळण घेतले असून, इराणने पाच अरब देशांकडेच युद्धातील नुकसानाची भरपाई मागितली आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहरीन आणि जॉर्डन या देशांनी इराणकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र इराणने ती फेटाळून लावत या देशांवरच गंभीर आरोप केले आहेत. अमेरिका आणि इस्रायलला इराणवर हल्ले करण्यासाठी आपला भूभाग आणि हवाई क्षेत्र वापरू देणे ही या अरब देशांची मोठी चूक असल्याचे इराणने म्हटले आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आखाती देशांमधील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इराणच्या प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, इराणचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी अमीर-सईद इरावानी यांनी महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. इरावानी यांच्या मते, ज्या देशांनी अमेरिका आणि इस्रायलला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केली, ते देश संयुक्त राष्ट्र सनदेच्या कलम ५१ अंतर्गत इराणकडे भरपाईची मागणी करू शकत नाहीत. उलट, इराणने आपल्या स्व-संरक्षणासाठी केलेल्या कारवाईत या देशांच्या भूभागाचा वापर शत्रू राष्ट्रांकडून झाल्याने, या अरब देशांनीच इराणला नुकसान भरपाई देणे कायदेशीररीत्या बंधनकारक असल्याचे इराणने ठामपणे मांडले आहे.
अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला सुमारे २७० अब्ज डॉलरचा प्रचंड मोठा फटका बसला आहे, अशी माहिती इराण सरकारच्या प्रवक्त्या फातेमा मोहाजेरानी यांनी दिली आहे. या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीचा हा केवळ प्राथमिक अंदाज असून, प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इराणच्या आर्थिक विभागाकडून या नुकसानीचे मूल्यांकन सध्या विविध टप्प्यांत केले जात असून, लवकरच अंतिम आकडेवारी समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इराणने आपल्या पत्रात असा दावा केला आहे की, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार आणि कुवेत या देशांच्या हवाई क्षेत्राचा वापर इराणमधील लष्करी आणि नागरी ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या लष्करी कारवाईत इराणचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला, तसेच मिनाब येथील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात १५० निष्पाप मुलांचा बळी गेला. या सर्व विध्वंसाला अरब देशांचे सहकार्य कारणीभूत असल्याचा ठपका इराणने ठेवला असून, या देशांनी तात्काळ इराणविरोधी कारवायांना मज्जाव करावा, अशी मागणी केली आहे.