अमेरिका-इराण चर्चेची दुसरी फेरी १६ एप्रिलला होण्याची शक्यता

युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्नांना वेग

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
अमेरिका-इराण चर्चेची दुसरी फेरी १६ एप्रिलला होण्याची शक्यता

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : अमेरिका (USA) आणि इराण (Iran)  यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दुसऱ्या फेरीच्या चर्चेची हालचाल वेगाने सुरू झाली आहे. १६ एप्रिल रोजी या चर्चेची पुढील फेरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इस्लामाबाद (Islamabad)  येथे झालेल्या पहिल्या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. मात्र, युद्ध समाप्तीच्या दृष्टीने दोन्ही देशांनी पुन्हा प्रत्यक्ष चर्चेसाठी तयारी दर्शवली असल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित सूत्रांनी दिली आहे.

मध्यस्थी करणाऱ्या देशातील एका राजनैतिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तेहरान (Tehran) आणि वॉशिंग्टन (Washington)  यांनी दुसऱ्या फेरीसाठी सहमती दर्शवली आहे. तथापि, या बैठकीसाठी कोणत्या स्तराचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

दरम्यान, चर्चेचे ठिकाण म्हणून पुन्हा इस्लामाबादचा विचार केला जात असून, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा हाही एक पर्याय समोर आला आहे. अंतिम स्थळ आणि वेळ निश्चित झालेले नसले, तरी गुरुवारी (१६ एप्रिल) चर्चा होण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जागतिक पातळीवर या चर्चेकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असून, संभाव्य करारामुळे प्रादेशिक तणाव कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा