कोळसा घोटाळा प्रकरणात आय-पॅकचे संचालक विनेश चंडेल यांना अटक

१० दिवसांची ईडी कोठडी; २३ व २८ एप्रिलला पश्च‌िम बंगालात विधानसभा निवडणूक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
कोळसा घोटाळा प्रकरणात आय-पॅकचे संचालक विनेश चंडेल यांना अटक

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात आय-पॅकचे (I-PAC)  सह-संस्थापक व संचालक विनेश चंडेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (Enforcement Directorate (ED)) अटक केली आहे. दिल्लीतील विशेष न्यायालयाने त्यांना १० दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोमवारी उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर चंडेल यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर प्रतिबंधक मनी लॉन्डरिंग कायदा (PMLA) अंतर्गत विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ईडीच्या कोठडीच्या मागणीला मान्यता देत पुढील चौकशीसाठी १० दिवसांची कोठडी सुनावली.

विधानसभा निवडणूक जवळ असताना अटक 

दरम्यान, ही कारवाई पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी अवघ्या काही आठवड्यांपूर्वी झाली असून, मतदान २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत होणार आहे.

या प्रकरणात राज्यातील कोळसा खाणीत झालेल्या कथित अनियमिततेचा तपास सुरू असून, ईडीने २ एप्रिल रोजी दिल्लीतील चंडेल यांच्याशी संबंधित ठिकाणी, बेंगळुरूमधील आय-पॅक सह-संस्थापक ऋषी राज सिंह यांच्या निवासस्थानी तसेच मुंबईतील विजय नायर यांच्या ठिकाणी छापे टाकले होते. यापूर्वी ८ जानेवारी रोजी आय-पॅकच्या कार्यालयासह कोलकात्यातील संस्थापक प्रतिक जैन यांच्या निवासस्थानीही शोधमोहीम राबवण्यात आली होती.

या कारवाईदरम्यान राजकीय वाद निर्माण झाला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचा आरोप ईडीने केला आहे. मात्र, राज्य सरकार आणि तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावत, निवडणूक रणनीतीशी संबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

सत्तेचा गैरवापर : ईडी 

ईडीने या प्रकरणात शोधमोहीमेदरम्यान “सत्तेचा गैरवापर” झाल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात सीबीआय चौकशीची मागणी केली असून, यावर सध्या सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, २०२० मध्ये सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरवरून या प्रकरणाची सुरूवात झाली असून, आसनसोलजवळील ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाणींमध्ये कोट्यवधी रुपयांचा कोळसा तस्करी घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

निवडणुकीला १० दिवस असताना अटक : बॅनर्जी

या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देताना, “निवडणुकीच्या अवघ्या १० दिवस आधी झालेली ही अटक चिंताजनक असून; निष्पक्ष निवडणुकीच्या तत्त्वालाच धक्का देणारी आहे,” असे म्हटले आहे. या घडामोडींवर आय-पॅककडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हेही वाचा