
पणजी : गोव्यात (Goa) मागील वर्षी आगीची एक भीषण घटना घडली होती. याबाबत आम्हाला खेद आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पर्यटन (Tourism) तसेच उद्योग क्षेत्राने काळजी घेतली पाहिजे. दोन्ही क्षेत्रांनी अग्नी सुरक्षेबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.
मंगळवारी राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिनानिमित्त (National Fire Service Day) आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दलाचे संचालक नितीन रायकर, मुख्य सचिव व्ही कांदावेलू, डॉ. उदयसिंह रावराणे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) सांगितले की, अग्निशामक दलातर्फे उद्योगांना अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाते. व्यवसाय सुलभता आणण्यासाठी ही प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. असे असले तरी अग्नी सुरक्षा ही केवळ अग्निशामक दलाची जबाबदारी नाही.
आगीच्या घटना घडू नयेत यासाठी पर्यटन, उद्योग क्षेत्राने देखील आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. अशा घटना टाळण्याची जबाबदारी सामान्य जनतेचीही आहे. आरोग्य क्षेत्रात उपचारापेक्षा आजार होऊच नये यासाठी प्रयत्न केले जातात. हा नियम अग्नी सुरक्षेलाही लागू होतो.
नितीन रायकर यांनी सांगितले की, मागील वर्षी खात्याला ८०२१ कॉल आले होते. यातील २९४२ आगी संबंधित तर ५०७९ अन्य आपत्कालीन परिस्थितीबाबतचे होते. मागील वर्षी दलाला १६५ लोकांचे तर ८७४ जनावरांचे प्राण वाचवण्यात यश आले. दलातर्फे शाळा, महाविद्यालयात जागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ४५८३ शिक्षक, ४४६८ सामान्य नागरिक तसेच ६३५ आपदा मित्र आणि सखींना अग्नी सुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे. अग्निशामक दलाचा आपत्कालीन क्रमांक लवकरच ११२ या प्रणालीशी संलग्न करण्यात येणार आहे.
तिन्ही जिल्ह्यात क्षेत्रीय नियंत्रण कक्ष
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दलातर्फे लवकरच तिन्ही जिल्ह्यात क्षेत्रीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. यानुसार पणजी, मडगाव आणि कुडचडे येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात येईल. राज्य प्रशिक्षक नियंत्रण कक्षाचे रुपांतर अकादमीमध्ये करण्यात येईल. येथे दलाच्या जवानांसह सामान्य लोकांनाही अग्नी सुरक्षेचे प्रशिक्षण घेता येईल.