सत्तरी, काणकोणची शेतकरी आघाडीवर : पारंपरिक कुंपणांसह सौर उर्जेवरील कुंपणांचीही उभारणी

पणजी : गोवा राज्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी कुंपण (वंप) घालण्याच्या कामासाठी गेल्या ५ वर्षांत सरकारने एकूण १०.४० कोटी रुपयांहून अधिक अनुदानाचे वाटप केले आहे. रानटी जनावरे आणि मोकाट गुरांपासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सत्तरी आणि काणकोण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सर्वाधिक रस दाखवला असल्याची माहिती कृषी संचालनालयाने दिली आहे.
सत्तरी तालुका अनुदानात अव्वल
कृषी संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सत्तरी तालुका अनुदान मिळवण्यात सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात या तालुक्यातील ९५ लाभार्थ्यांनी एकूण ८८.८९ लाख रुपयांचे अनुदान घेतले. २०२१-२२ मध्ये हा आकडा केवळ ७.१५ लाख रुपये इतका होता, जो आता अनेक पटींनी वाढला आहे. येथील शेतकऱ्यांनी साध्या कुंपणासोबतच दगडाची भिंत बांधण्यावरही भर दिला आहे.
राज्यात पिकांच्या संरक्षणासाठी 'चॅनलिंग' कुंपणाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. २०२४-२५ या वर्षात वाटप झालेल्या एकूण २.८७ कोटी रुपये अनुदानापैकी १.८४ कोटी रुपये केवळ चॅनलिंग कुंपण घालण्यासाठी वापरले गेले. काणकोण तालुक्यातील ४८ शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी सुमारे ४९.५९ लाख रुपयांचे अनुदान याच कामासाठी घेतले आहे.पारंपारिक कुंपणासोबतच काही तालुक्यांनी आधुनिक सौर ऊर्जा कुंपण बसवण्याचा प्रयत्न केला होता. फोंडा तालुक्यात २०२२-२३ मध्ये १७ लाभार्थ्यांनी यासाठी १७.९९ लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. मात्र, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आतापर्यंत सौर ऊर्जा किंवा हायब्रिड कुंपणासाठी एकही अर्ज आलेला नाही वा अनुदान दिले गेलेले नाही.
उत्तर गोव्यातील डिचोली आणि बार्देश तालुक्यात अनुदानाचे प्रमाण चांगले असले तरी, मुरगाव तालुक्यात मात्र या योजनेचा कमी प्रतिसाद दिसून येत आहे. मुरगावमध्ये मागील ५ वर्षांत फक्त एकाच लाभार्थ्याने अनुदान घेतले. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत राज्यातील १७५ शेतकऱ्यांना १.६७ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
