पर्यटकांच्या वागणुकीवरून सोशल मीडियावर नवा वाद; हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितला मुंबई-बेंगळुरूच्या पर्यटकांचा अनुभव

पणजी: निसर्गरम्य किनारे आणि फिरण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या गोव्यात सध्या एका हॉटेल कर्मचाऱ्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई, बेंगळुरू आणि दिल्ली येथील पर्यटकांच्या वागणुकीतील तफावत सांगणारा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावरून नेटिझन्समध्येही दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये गोव्यातील एका हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्यांनी दिल्लीच्या पर्यटकांना 'उद्धट' ठरवत मुंबई आणि बेंगळुरूच्या पर्यटकांचे त्यांच्या सभ्य वर्तणुकीबद्दल कौतुक केले आहे. त्या असे का म्हणाल्या याबाबत स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले आहे. काय म्हणाल्या या दोघी, वाचा.
हा व्हिडिओ हनुमंत नाईक या हॉटेल व्यावसायिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला नाईक हॉटेलमधील दोन महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसतात. सध्या गोव्यात विदेशी पर्यटकांची संख्या घटल्याने भारतीय पर्यटकांचा ओघ वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर नाईक कर्मचाऱ्यांना विचारतात की, तुम्हाला दिल्ली, मुंबई की बेंगळुरू, कुठले पर्यटक हॉटेलमध्ये यायला हवेत? यावर महिला कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता दिल्लीच्या पर्यटकांना नकार दिला.

दिल्लीचे पर्यटक उद्धट असतात का? या प्रश्नावर त्या कर्मचाऱ्याने अतिशय स्पष्टपणे आपली मते मांडली. ती म्हणाली, दिल्लीचे लोक खूप उद्धटपणे बोलतात. त्यांची बोलण्याची पद्धत 'ओय! इकडे ये, पाणी आण, चहा आण' अशी हुकुमी पद्धतीची आणि अरेरावी धाटणीची असते. याउलट मुंबईचे लोक खूप चांगले आहेत. ते सन्मानाने आणि प्रेमाने बोलतात. तसेच बंगळुरूच्या पर्यटकांचेही तिने तोंडभरून कौतुक केले. दिल्लीकर पर्यटकांचा स्वभाव 'रफ' (उद्धट) असतो, अशा शब्दांत तिने आपला अनुभव सांगितला. यास तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिला सहकाऱ्यानेही दुजोरा दिला.

हा व्हिडिओ शेअर करताना हनुमंत नाईक यांनी स्पष्ट केले की, कोणाचाही द्वेष करण्याचा किंवा कोणाला लक्ष्य करण्याचा त्यांचा हेतू नाही. केवळ हॉटेलमधील सेवा कर्मचारी दररोज ज्या अनुभवातून जातात, तेच दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ सर्वच दिल्लीकरांसाठी नाही, जे सभ्य आहेत त्यांचे स्वागतच आहे, असेही त्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केले.

या व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या कर्मचाऱ्याच्या मताशी सहमती दर्शवली आहे. एका युजरने कमेंट केली की, दिल्लीकर खरोखरच उद्धट असतात, मी स्वतः दिल्लीची असूनही मला हे मान्य करणे भाग आहे! तर दुसऱ्या एका पर्यटकाने आपला अनुभव सांगताना म्हटले की, गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये केवळ बोलण्यावरून वेटरने त्यांना ते मुंबईचे आहेत का? असे विचारले होते, कारण त्यांचे बोलणे नम्र होते. दुसरीकडे, काही दिल्लीकरांनी याला 'स्टिरिओटाईप' म्हणत विरोध दर्शवला आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, सर्वांना एकाच तराजूत तोलणे चुकीचे आहे, असे काहींचे मत आहे. या व्हिडिओने पुन्हा एकदा 'मुंबई विरुद्ध दिल्ली' या जुन्या वादाला फोडणी दिली असून पर्यटनाच्या ठिकाणी बेसिक सिव्हीक सेन्स आणि वागणुकीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.