कटमगाळ दादा

गावच्या भाविकांनी कटमगाळ दादांना गाऱ्हाणे घातले. पीक आमच्या पदरात पडले तर त्याच तांदळाच्या गाेडशाचा नैवेद्य तुला अर्पण करीन असा नवस केला आणि काय आश्चर्य! किडीचा प्रादुर्भाव नष्ट हाेऊन त्यावर्षी भरपूर उत्पन्न मिळाले.

Story: जत्रा |
16th April, 11:14 pm
कटमगाळ दादा

फाेंडा तालुक्यात फर्मागुडी येथून जवळच असलेल्या कटमगाळ येथे दादांचे वसतीस्थान आहे. येथे तुम्हाला भव्यदिव्य मंदिराऐवजी हिरव्यागार वनस्पतींनी नटलेला निसर्गरम्य परिसर दिसेल. विशाल डेरेदार वृक्षांची वनराई, कांबळी, गुढ्या आणि रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सुशाेभित केलेला, पेड बांधून काढलेला एक विशाल वृक्ष हेच दादांचे वसतीस्थान. 

दैवतांच्या नावे राखून ठेवलेल्या या निर्जन वनराईच्या माध्यमातून निसर्गाचे पूजन व त्यांचे संरक्षण हेच पूर्वजांचे ध्येय असावे.

‘कटमगाळ दादा’ म्हणजे अंत्रुज महालातील नागेशी, गावणे, बांदिवडे, वेलिंग, गावठण या पंचक्राेशीतील लाेकांचा रक्षणकर्ता. कमरेला धाेतर, खांद्यावर घाेंगडी, कानात बाळी, झुपकेदार मिशा, हातात पेटती मशाल, एका हातात काठी, विशाल देहयष्टी. विशेषत: रात्री अपरात्री फिरणारा देव. गावाचा राखणदार. याला ‘देवचार’ असेही म्हणतात.

प्रत्येक गावामध्ये देवचार असतात. गावाच्या सीमा रक्षणाचे काम देवांनी त्यांच्यावर साेडलेले असते. गावाबाहेरील भूत-प्रेत, ब्रम्ह-समंध या दुष्ट शक्तींना गावच्या वेशीत प्रवेश करु न देता त्यांना तेथेच अडवून अडल्या-नडल्या व्यक्तींना दृश्य-अदृश्यपणे मदत करण्याचे काम ही शक्ती करीत असते. सत्तरी गावचा आजाेबा; म्हापशाचा बाेडगेश्वर त्याचप्रमाणे कटंगाळीचा कटमगाळ दादा.

पूर्वी कधीतरी गावणे-बांदिवडे या पंचक्राेशीतील गावामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती उद्भवली. गावातील उभे पीक किड्या-मुंग्यांच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट हाेण्याची चिन्हे दिसू लागली. गावच्या भाविकांनी कटमगाळ दादांना गाऱ्हाणे घातले. पीक आमच्या पदरात पडले तर त्याच तांदळाच्या गाेडशाचा नैवेद्य तुला अर्पण करीन असा नवस केला. आणि काय आश्चर्य! किडीचा प्रादुर्भाव नष्ट हाेऊन त्यावर्षी भरपूर उत्पन्न मिळाले. त्यानंतर तांदूळ, मूग, गूळ, खाेबरे, वेलची यासारखे पदार्थ आणून गाेडशाचा नैवेद्य केला. श्रावणातील पहिल्या रविवारी नैवेद्य अर्पण करुन नवस फेडला. वर्षानुवर्षे गाेडशाची परंपरा कायम ठेवली. श्रावणातील सर्व रविवारी देवाला गाेडशाचा नैवेद्य दिला जाऊ लागला. कटमगाळ दादा व गाेडशाची गाेवाभर प्रसिद्धी झाली.

नवसाला पावणारा देव अशी ख्याती झाल्याने गाेव्यातील तसेच गाेव्याबाहेरील लाेकही इथे येऊन जागृत देवस्थानाची प्रचिती घेऊ लागले. आज तर श्रावणातील प्रत्येक रविवारी कटमगाळला जत्रेचे स्वरूप येते. महाराष्ट्र, कर्नाटक अशा दूरदूरच्या ठिकाणाहून भाविक मुद्दाम येथे येतात. दादांना नवस बोलतात. मनोकामना पूर्ण हाेताच कांबळ, गाेडशाचा नैवेद्य अर्पण करुन नवस फेडतात. दुपारी गाेडशाचा कार्यक्रम झाल्यानंतर तेथील वनराईतील वृक्षांच्या पानावर गाेडशाचा नैवेद्य घेऊन कटमगाळ दादांचे गुणगान गात आपली मनाेकामना निश्चितपणे पूर्ण हाेईल या विश्वासाने लवकरच पुन्हा दर्शनाला येण्याचे ठरवून माघारी फिरतात.

हेही वाचा