
पणजी : गृह खात्याने (Home Department) भाडेकरू पडताळणी कायद्याच्या नवीन नियमांबाबत अधिसूचना जारी केली आहे. यानुसार घरमालकाला त्याच्या भाडेकरूची ओळख पटवून देणाऱ्या कागदपत्रांसह पडताळणी अर्ज पाच दिवसांत नजीकच्या पोलीस स्थानकात द्यावा लागेल. मालकाला स्वतः पोलीस स्थानकात (Goa Police Station) जाऊन अर्ज द्यावा लागेल.
अथवा ठराविक शुल्क भरून ऑनलाईन (Online) पद्धतीने देखील अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. पडताळणी अर्ज न दिल्यास अथवा भाडेकरूंची माहिती स्वतंत्र रजिस्टर मध्ये न ठेवल्यास घरमालकाला सहा महिन्यांचा तुरुंगवास अथवा १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. याबाबत ऑगस्ट २०२५ मध्ये मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली होती. यावर आलेल्या सूचनांची दखल घेऊन नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
मसुदा अधिसूचनेत मालकांना पडताळणी अर्ज दोन दिवसांत देणे आवश्यक करण्यात आले होते. यामध्ये बदल करून आता हा कालावधी पाच दिवसांचा करण्यात आला आहे. नवीन अधिसूचनेनुसार घरमालकाला भाडेकरूची मूळ कागदपत्रे तपासावी लागतील. त्याला या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह विहित नमुन्यातील अर्ज नजीकच्या पोलीस स्थानकात द्यावा लागणार आहे. पोलीस स्थानकाकडून घरमालकाला पडताळणी अर्जाची पोचपावती देण्यात येईल.
याशिवाय मालकाला एका स्वतंत्र रजिस्टरमध्ये त्याच्याकडे राहत असणाऱ्या भाडेकरुंची वेगळी नोंदणी करून ठेवावी लागेल. माहिती न देणाऱ्या घरमालकाबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला तीन दिवसांत याबाबतचा अहवाल उपविभागीय दंडाधिकार्यांना द्यावा लागेल.
हा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी त्या घरमालकाला आपल्या समोर उपस्थित राहण्याबाबत नोटीस पाठवतील. तसेच कायद्याच्या कलम ५ नुसार मालकाला दंड करण्यात येणार आहे. चुकीची माहिती दिलेल्या किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या भाडेकरुंबाबत हेड कॉन्स्टेबल किंवा त्यावरील अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सात दिवसांत अहवाल देणे आवश्यक आहे.