स्मार्ट मीटर विषयी कोणतीही चर्चा होणार नाही : सुदिन ढवळीकर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
स्मार्ट मीटर विषयी कोणतीही चर्चा होणार नाही : सुदिन ढवळीकर

पणजी : गोव्यात स्मार्ट वीज मीटर (Smart Electric meter in Goa)  बसवण्यापूर्वी खात्याने तसेच मी स्वतःने देखील त्यांचा सखोल अभ्यास केला आहे. स्मार्ट मीटरमुळे जनतेचाच फायदा होणार आहे.

आम्ही केंद्र सरकार, जेईआरसीच्या (JERC)  नियमांनुसारच स्मार्ट मीटर बसवत आहोत. त्यामुळे याविषयावर आता कोणतीही चर्चा होणार नाही. मीटर बसवल्यावर त्याचा निकाल चांगलाच येईल; अशी आमची खात्री आहे. त्यानंतर आम्ही याबाबत चर्चा करू शकतो असे प्रतिपादन वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. 

ढवळीकर यांनी गुरुवारी अखिल भारतीय स्थानिक प्रशासन संस्थेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आधुनिक गोष्टी लागू करण्यात गोवा देशात आघाडीवर आहे. गोव्यातील जनतेला अद्याप स्मार्ट मीटरचे फायदे माहिती नाहीत.

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना आपल्याला कोणत्या उपकरणांमुळे बिल अधिक आले हे समजेल. घरातील विद्युत उपकरणे चुकून सुरू राहिल्यास अन्य ठिकाणी जाऊन मोबाईलद्वारेही वीज बंद करता येईल. ही प्रणाली प्रीपेड असल्यामुळे देखील ग्राहकांचा फायदा होईल. 

तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी देशभरातील स्थानिक नागरी संस्थेच्या महापौर, नगरसेवकांना संबोधित केले. ते म्हणाले, अखिल भारतीय स्थानिक प्रशासन संस्था ही राज्य आणि केंद्र सरकार मधील दुवा आहे.

नवनियुक्त नगरसेवकांसाठी मार्गदर्शन करण्याचे काम संस्था करते. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक लोक प्रतिनिधीने उत्फूर्तपणे काम करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिक केंद्रीत कामांना प्राधान्य द्यावे. त्यांनी शाश्वत विकासाची कामे करावीत. चांगले प्रशासन देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.  

पोटनिवडणुकीविषयी बोलणार नाही 

फोंडा पोटनिवडणुकीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने; याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. विधानसभा अधिवेशनाबाबत कॅबिनेट योग्य तो निर्णय घेईल. कॅबिनेटमध्ये अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना आहे.

हेही वाचा